पनीर असली आहे की भेसळयुक्त? कसे ओळखाल?

पनीरमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले प्रोटीन्स असल्याने डॉक्टर पनीर खाण्याचा सल्ला देतात. तसेच पनीर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडत असल्याने बहुतेक घरात पनीरच्या वेगवेगळ्या डिशेसही बनवल्या जातात. पण इतर पदार्थांप्रमाणेच काहीजण पनीरमध्येही भेसळ करतात.यामुळे हे भेसळयुक्त पनीर पोटात गेल्यास आजार होऊ शकतो. हे टाळायचे असेल तर असली पनीर व नकली म्हणजेच भेसळयुक्त पनीर यातला फरक ओळखता आला पाहीजे. त्यासाठी काही टीप्स..

सर्वप्रथम पनीरचा छोटा तुकडा हातात घेऊन बघा. तो नुसत्या बोटांनी दाबल्यावर त्याचे तुकडे होत असतील तर ते पनीर नकली आहे हे समजून घ्या. कारण नकली पनीर दूधाच्या भुकटी म्हणजे पावडरपासून बनवलेले असते. ते बोटांचा दाबही सहन करू शकत नाही व लगेच तुटते.

तसेच पनीर गरम पाण्यात उकळून घ्या. थंड झाल्यावर त्याच्यावर आयोडीन टींचरचे काही थेंब टाका. जर पनीर निळे झाले. तर ते नकली भेसळयुक्त आहे. हे ओळखा.

त्याचबरोबर असली पनीर सॉफ्ट असते. तर नकली पनीर कडक असते. तसेच खाताना ते रबराप्रमाणे वातड लागते.

पनीर असली की नकली हे ओळखण्याची अजून एक पद्धत आहे. त्यासाठी पनीर पाण्यात उकळून घ्यावे. थंड झाल्यावर त्यावर सोयाबीन किंवा तूरीच्या डाळीची पावडर टाकावी. दहा मिनिटानंतर जर पनीर लालसर झाले तर ते नकली आहे हे समजून जावे. या नकली पनीरमध्ये कपडे धुण्याची पावडर आणि युरिया टाकलेला असतो. त्यामुळेच त्याचा रंग बदलतो व ते लालसर होते.

हे भेसळयुक्त पनीर खाल्ल्यास पोटदुखी, टायफाईड,अतिसार, कावीळ, डोकेदुखी, अल्सर होऊ शकतो.

First Published on: July 6, 2021 4:10 PM
Exit mobile version