मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी काय करावे?

मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी काय करावे?

शारीरिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी आपण जिम आणि डाएट करतो. कमी कॅलरीज असलेल्या अन्नाचे सेवन करतो. फार तर कधी कधी जेवण टाळून फलाहार घेतो. पण ज्या मनातील विचारांवर आपला मेंदू काम करत असतो. अनेक भावनिक आव्हाने पेलत असतो. त्याची काळजी मात्र आपल्याकडून सहसा घेतली जात नाही. यासाठी काय करायचे हेच आपल्यापैकी बऱ्याचजणांना माहित नसते. यावरच आम्ही तुम्हांला काही टिप्स देत आहोत.

रोजच्या धकाधकीच्या रुटीन लाईफमध्ये प्रत्येक व्यक्तीला ताणाला सामोरे जावे लागते. हा ताण कधी ऑफिसमधल्या कामाचा असतो तर कधी नातेसंबंधातून आलेला असतो. मनाचा आणि शरीराचा एकमेकांशी संबंध असल्याने साहजिकच मनावरील ताणामुळे बरेचजण आजारी पडतात. मधुमेह, उच्चरक्तदाब याबरोबरच अनेक व्याधींनी ग्रासल्यानंतर आपण उपचारासाठी धावाधाव करतो. पण वेळीच जर त्यावर नियंत्रण मिळवले तर भविष्यातील अनेक व्याधी टाळता येऊ शकतात.

यासाठी स्वत:ला रोज कमीत कमी ३० मिनिटं तरी व्यायाम करण्याची सवय लावावी. वेळेचा अभाव असेल तरी दिवसातून एकदा तरी ३० मिनिटं चालावे. शारीरिक श्रमामुळे मेंदूला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होतो. जेणेकरून स्मरणशक्ती तर वाढतेच. पण शांत झोपही लागते.

शरीरातील व्हिटामिन बी हे देखील मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असते. मेंदूला चालना देण्याचे काम व्हिटामिन बी करते. यामुळे हिरव्या पालेभाज्या, डाळी, दुग्धजन्य पदार्थ यांचा आहारात आवर्जून समावेश करावा.

तसेच खाण्याबरोबरच मेंदूला चालना देण्यासाठी आवडत्या विषयांवरील पुस्तकांचे वाचन, शब्दकोडे, बुद्धीबळ यासारखे खेळ खळावेत. गाणी ऐकावीत .यामुळे मेंदू तल्लख तर होतोच शिवाय येणाऱ्या प्रत्येक बरी वाईट परिस्थिती हाताळण्याचा आत्मविश्वासही निर्माण होतो.

तसेच आठवड्यातून एखादा दिवस हा पूर्ण आरामासाठी द्यावा. ताण देणाऱ्या व आणणाऱ्या वस्तू व व्यक्तींपासून स्वत:ला लांब ठेवावे. मोबाईल किंवा फोन बंद ठेवावा. जेणेकरून कोणीही तुम्हांला डिस्टर्ब करू शकणार नाही. तसेच सतत किटकिट व आक्रस्ताळेपणा करून तुम्हांला हैराण करणाऱ्या व्यक्तींपासून अंतर ठेवावे. ज्यामुळे तुम्ही मनशांति अनुभवू शकाल.

कितीही बिझी असलात तरी एखादातरी छंद जोपासा. कारण आवडणारा छंद मनाला आनंद तर देतोच शिवाय आत्मविश्वासही वाढवतो. मित्रांबरोबर फिरायला जा.

नियमित शारीरिक तपासणी करावी. ज्यामुळे आजार बळावणार नाही. वेळीच उपचार केल्याने आजारही बरा होईल.

तसेच ज्या व्यक्तींबरोबर बोलण्याने मन हलके होते अशा व्यक्तींच्या किंवा नातेवाईकांच्या संपर्कात राहावे. जेणेकरून मनावरील ताण हलका होतो. यामुळे आत्मविश्वास तर बळावतोच त्याबरोबर विचारांची देवाण घेवाण झाल्याने जुन्याच प्रश्नांची नव्याने उत्तर शोधता येतात. लॉँग ड्राईव्हला जा, मोकळ्या हवेत वॉक करावा.

त्याचबरोबर आवड म्हणून विविध कामे हाताळावीत. त्यातही जी कामे करण्यात कौशल्याची गरज असते. अशा कामांना प्राधान्य द्यावे. कारण त्यातून तुम्ही व्यक्त होत असता. यात लिखाण, पेटींग, सुतारकाम, नक्षीकाम यासारख्या कामांचा समावेश असतो. यामुळे तुमचे मन हलके होते.

तसेच मेंदूला चालणा देण्यासाठी प्रश्न उत्तर असलेले कार्यक्रमही उपयुक्त असतात. त्यामुळे मनावरचा ताण तर हलका होतो.

First Published on: March 2, 2020 6:08 PM
Exit mobile version