Health : जागरणामुळे वाढते वजन, खुंटते बुद्धी

Health : जागरणामुळे वाढते वजन, खुंटते बुद्धी

अपूर्ण झोप शरीरावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. झोपेच्या कमतरतेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यासाठी डॉक्टर कायम सर्व वयोगटातील व्यक्तींना पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात. पण, हल्ली बदलत्या लाइफस्टाइलमुळे लोकांची झोप होत नाही. लोकांना गॅझेट्सचे व्यसन लागल्याने अनेकजण त्यावर रात्ररात्रभर खेळत आहेत. पण, याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. तसेच अनेक आजारांना देखील आमंत्रण मिळत आहे.

जागरणाचे परिणाम –

वजन – जागरणामुळे वजनही वाढते. जागरण केल्याने व्यक्ती सकाळी उशिरा उठतो. उशिरा उठल्यावर वारंवार तुम्हाला भूक लागू शकते. पण, आजच्या धावपळीच्या जगात उशिरा उठल्याने नाष्टा करायला वेळ मिळत नाही. साहजिकच यामुळे व्यक्ती जंक फूडकडे वळला जातो. परिणामी, व्यक्तीच्या वजनात झपाट्याने वाढ होते.

बुद्धी – रात्री जागरण केल्याने तुमच्या एकाग्रतेवर याचा प्रचंड मोठा परिणाम दिसून येतो. रात्रीची अपूर्ण झोप अनेक आजारांना आमंत्रण देणारी ठरते. जर तुम्ही रात्री पुरेशी झोप घेतली नाही तर दिवसा चक्कर येणे प्रकर्षाने जाणवते. तसेच कोणतेही काम करताना तुम्ही काम एकाग्रतेने करू शकत नाही. एकाग्रता न मिळविता आल्याने बुद्धीवर याचा परिणाम दिसून येतो.

डार्क सर्कल – रात्री उशिरा झोपल्याने डोळ्यांखाली काळे वर्तुळे अर्थात डार्क सर्कल येतात. डोळ्याखाली डार्क सर्कल येण्याला डोळ्यांवरील ताण कारण असते. दिवसापेक्षा रात्री अंधारात कम्प्युटर किंवा मोबाईलवर गोष्टी पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो. डार्क सर्कल्स व्यतिरिक्त जागरणामुळे केस आणि त्वचेशी संबंधित समस्या उध्दभवतात.

निद्रानाश – शरीराच्या झोपेचे एक निश्चित चक्र असते. त्यानुसार तुम्हाला झोप येते. पण तुम्ही रात्री जर जागरण केलेत तर झोपेच्या वेळात बदल होतो. परिणामी, तुम्हाला निद्रानाशेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. निद्रानाशेमुळे झोप येत नाही.

डोकेदुखी – रात्रीच्या जागरणाचा मेंदूवर खोलवर परिणाम होतो. परिणामी, मेंदूच्या नियमित कार्यात व्यत्यय आल्यावर अनेक आजार डोके वर काढू लागतात. अपूर्ण झोपेमुळे तीव्र डोकेदुखीच्या त्रासाला तुम्हाला सामोरे जावे लागते.

एन्जायटी – जागरणामुळे तुमचा मूडही खराब होऊ शकतो. हे सर्व अपूर्ण झोपेमुळे होते. जेव्हा तुमचा मूड खराब असतो तेव्हा चिंता सतावणे स्वाभाविक आहे. रात्रीच्या जागरणामुळे तुम्ही सकाळी उशिरा उठता. सकाळी उशिरा उठल्याने दिवसभराचे रुटीन बिघडते. त्यामुळे तुम्हाला चिंता सतावू लागते. या सर्वाचा ताण येऊन तुमचे मानसिक आरोग्य बिघडू शकते.

 

 

 

 

 


हेही पहा :  महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज असते का?

 

First Published on: April 14, 2024 5:58 PM
Exit mobile version