न्यू गणेश लंच होम नाशिकमधील अप्रतिम चवीची खानावळ

न्यू गणेश लंच होम  नाशिकमधील अप्रतिम चवीची खानावळ

New Ganesh Lunch Home

साधारण दोन वर्षांपूर्वी ऑफिसच्या कामासाठी नाशिकला जाणे झाले होते. तेथील वार्ताहरांची मिटिंग संपल्यावर सहज एका वार्ताहरला इथे चांगले कुठे जेवायला मिळते, असा प्रश्न केला. तेव्हा सुुरुवातीला त्याने मला नॉनवेज जेवणाच्या खानावळींची दोन-चार नावे सांगितली. पण नाशिकचे जेवण हे खूप तिखट असते हे ऐकून होतो. त्यामुळे मी नॉनवेजला नकार दिला. त्याबरोबर त्याने गंगापूर नाक्यावरील न्यू गणेश लंच होमचे नाव सांगितले. त्याच्याकडे मोटरसायकल होती. त्यामुळे तेथे मला घेऊन जायला तयार होता. दुपारी चार वाजताची माझी परतीची बस होती. त्यामुळे थोडेसे पोटात ढकलू या इच्छेने मी न्यू गणेश लंच होममध्ये गेलो.

हे हॉटेल पूर्णत: शाकाहारी होते. या ठिकाणी दोन प्रकारच्या थाळी उपलब्ध होत्या. एक लिमिटेड आणि दुसरी अनलिमिटेड. वार्ताहराच्या आग्रहावरून अखेर अनलिमिटेड थाळी घ्यायचे ठरले. चपाती, बटाट्याची रस्सा भाजी, दोन सुक्या भाज्या, आमटी, कढी, भात चटणी, कोशिंबीर, ठेचा, लोणचं असा मेन्यू होता. फार खाण्याची इच्छा नव्हती त्यामुळे ताटात येईल ते संपवून निघू असे ठरवले. चपाती तोडून बटाट्याच्या रश्यात ती बुडवली आणि तोंडात टाकली. त्यानंतर एखाद्या चित्रपटाचा क्लायमॅक्स कसा चटकन बदलतो तसा माझा मूड बदलला. त्या पहिल्या घासाने माझ्या चव इंद्रियांवर असा काही परिणाम केला की विचारू नका.

साध्या बटाट्याच्या रस्सा भाजीची चव जीभेवरून जाऊच नये असे वाटत होते. त्यानंतर सलग पाच पोळ्या त्या रस्सा भाजीसोबत पोटात शिरल्या. मधूनमधून आंबट गोड कढी रिचवत होतो. सुख्या भाजीत गवार आणि मटकी होती. गवार मला फारशी आवडत नाही. पण त्या दिवशी मी गावरान आणि अस्सल गवार भाजीचा आस्वाद घेतला. न्यू गणेश लंच होममध्ये थाळीत आलेल्या प्रत्येक पदार्थाची चव अप्रतिम होती. साधे लोणचे आणि ठेचाही खूप चविष्ट लागला. फारसे काही खायचे नाही हे मी ठरवले असताना त्या दिवशी मी पोट भरून जेवलो. सुरुवातीला मी माझ्या वार्ताहर सहकार्‍याला अनलिमिटेड थाळी नको म्हणत होतो, पण त्याच्या आग्रहास्तवर मी अनलिमिटेड थाळी घेतली. तो त्या वार्ताहराचा निर्णय योग्य ठरला. न्यू गणेश लंच होममधील साधे पण चविष्ट भोजनाने माझ्यावर भुरळ घातली. हे पदार्थ पुणेरी पद्धतीचे मात्र नाशिकचा टच असलेले होते.

हिरवा ठेचा तर अस्सल होता. हिरव्या मिरच्या, लसूण व शेंगदाण्याचा कुट वापरून तो बनवला होता. तो तोंडात टाकताना हाहू होणार असे वाटत होते. मात्र तसे काहीच झाले नाही. उलट तो इतक्यावेळी पोटात गेला की वाटणारा वाडपी माझ्याकडे आश्चर्यकारक नरजेने पहात होता. गाजराच्या कोशिंबीरीचा स्वादही खूप चांगला होता. विशेष म्हणजे त्यात ओले खोबरे घातलेले होते. एकंदरीत गणेश लंच होमची चव फारच आवडली. मी नॉनवेजचा चाहता आहे. मात्र नाशिकमधील नॉनवेज मी अद्याप चाखलेले नाही. त्याला कारण न्यू गणेश लंच होम. त्यानंतर मी नाशिकला अनेकवेळा गेलो पण प्रत्येकवेळी गणेश लंच होममध्येच जेवण्याचा माझा आग्रह होता.

First Published on: November 12, 2018 1:35 AM
Exit mobile version