आवर्जून खाव्यात पावसाळ्यातील रानभाज्या

आवर्जून खाव्यात पावसाळ्यातील रानभाज्या

पावसाळी भाज्या

पावसाळा सुरु झाला की, बाजारात रान भाज्या दिसायला लागतात. विशेष म्हणजे या भाज्या कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. कोणतही खत किंवा कीटकनाशक न वापरता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या या रानभाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच असते. या रानभाज्या मुरबाड, वसई, कर्जत, पालघर, सफाळे या ठिकाणी आढळतात. या भागातील आदिवासी मुंबईच्या इतर भागात येऊन या भाज्या विकततात. या भाज्या चवीला रुचकर असतातच; तसेच त्या पौष्टिक आणि औषधीसुद्धा असतात. जाणून घेऊया या रान भाज्यांविषयी.

 

टाकळा रानभाजी

टाकळा 

टाकळा ही वनस्पती पावसाळ्यात उगवते व ऑक्टोवर ते डिसेंबर या कालावधीत तिला फुले येतात. मेथीच्या भाजीप्रमाणे दिसणारी कोवळी रोपे भाजीसाठी आणली जातात. टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. टाकळ्याच्या पानांची भाजी सर्व प्रकारच्या त्वचारोगात औषधी म्हणून वापरतात तर त्याच्या बिया वाटून त्वचेवर लेप लावतात.टाळ्याची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत करते.

 

कुलुची भाजी

कुलुची भाजी

पावसाळ्याच्या अगदी पहिल्या सरीनंतर कुलुची भाजी रानात सर्वत्र दिसू लागते. अगदी काही दिवसातच ही भाजी तयार होत असल्याने बाजारात सर्वात आधी याच भाजीचं आगमन होतं. फोडशी किंवा कुलु किंवा काल्ला या नावाने हि रानभाजी ओळखली जाते. हि भाजी म्हणजे एक प्रकारचे गवतच असते. हि भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. इतर पावसाळी भाज्यांप्रमाणे हि चविष्ट असते. हि भाजी शाकाहारी व मांसाहारी ह्या दोन्ही प्रकारात करता येते.

 

कुरडू रानभाजी

कुरडूची भाजी

कुरडूची कोवळी पाने शिजवून त्याची भाजी करतात. दमेकरी जुनाट खोकला, वृद्ध माणसांचा कफविकार यात ही भाजी उपयुक्त आहे.कुरडूची पालेभाजीसुद्धा लघवी साफ करायला उपयोगी आहे. या पालेभाजीमुळे कफ कमी होतो. जुनाट विकारात कुरडूच्या पालेभाजीचा रस प्यावा. कुरडूच्या बिया मूतखडा विकारात उपयुक्त आहेत.

कर्टोली फळभाजी

कर्टोली

कर्टोली एक फळभाजी असून ती पावसाळ्यात उगवते. ही भाजी कारल्यासारखी दिसते आणि कडू सुद्धा असते. कारल्याची भाजी करतात तशीच या फळाची भाजी केली जाते. कर्टोलीची वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम घाट व पश्‍चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात. कर्टोली ला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व त्यानंतर फळे तयार होतात.
कर्टोली  हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.

दिंडा भाजी

दिंडा

दिंडा भाजी पावसाळा संपला की मृत अवस्थेत जाते आणि पावसाळ्याच्या पहिल्या सरीबरोबर त्याला नवे कोंब फुटू लागतात. पूर्ण वाढ होण्याआधीच तिची कोंब खुडले जातात. दिंडाची भाजी खास प्रसिद्ध आहे.

भारंग

भारंग

ही भाजी उगवल्यानंतर कोवळी असतानाच तोडली जाते. भारंगच्या पानांच्या कडा करवतीसारख्या दातांसारख्या असतात. भारंगाची सुकी भाजी विशेष लोकप्रिय आहे. ही भाजीसुद्धा झाडाचे नवीन फुटलेल्या कोंबाच्या व पानांच्या स्वरूपात काढली जाते. ‘व्हर्बिनॅसी’ कुळातील ह्य़ा भाजीचे शास्त्रीय नाव आहे Cleredendron serratum. करवतीसारख्या दातेरी पानांच्या कडा असल्याने याला सिरॅटम् असे म्हटले जाते. यांच्या पानामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. गणपतीच्या सुमारास ह्य़ा झाडास निळसर जांभळ्या रंगाचे फुलांचे तुरे येतात.

 

शेवळा पावसाळी रानभाजी

शेवळा

महाराष्ट्रामध्ये शेवळा वनस्पती कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र व अकोला येथील जंगलात आढळते. शेवळा म्हणजे खरं तर सुरणाच्या फुलांची दांडी. जमिनीत असलेल्या सुरणाच्या कांद्याला पावसाळा सुरू झाला की उंच दांडी असलेला फुलोरा बाहेर येतो. हा फुलोरा खरं तरं आतून गुलाबी व बाहेरून तपकीरी जांभळट रंगाच्या बोटीच्या आकाराच्या टोपणात झाकलेले असतात. फुलोरा अतिशय नाजूक सोनेरी पिवळसर रंगाचा व तळाकडे जांभळट होत गेलेला असतो. ह्य़ा फुलोऱ्याच्या तळाशी मादीफुले तर वरच्या बाजूस नरफुले असतात. भाजीसाठी संपूर्ण फुलोऱ्याची दांडीच वापरतात. ह्य़ामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण खूप असते, पण ताज्या दांडय़ाची भाजी लवकरात लवकर करणे आवश्यक असते. कारण फुलोऱ्याला झाकणारे टोपण व ह्य़ामध्ये असलेल्या जास्त प्रोटीन्समुळे हे शिळे झाले तर कुजलेल्या मांसासारखा घाणेरडा वास याला येऊ लागतो.

कपाळफोडी

कपाळफोडी 

ही वेलवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळते. या वनस्पतीची वेल जंगले, शेत आणि ग्रामीण भागात आढळते. कपाळफोडीच्या पानांची भाजी करतात. जीर्ण आमवातामध्ये पानांची भाजी खाण्याची प्रथा आहे. ही भाजी आमवात या संधिवाताच्या प्रकारात गुणकारी आहे. पोट गच्च होणे, मलाविरोध सारख्या विकारात कपाळफोडीच्या भाजीने आराम मिळतो. स्त्रियांची मासिक पाळी नियमित होत नसेल तर या भाजीचा चांगला उपयोग होतो.आधुनिक शास्त्रानुसार कपाळफोडीच्या पानात अँटिबायोटिक व अँटिपॅरासायटिक तत्त्वे असल्याने जुनाट खोकल्यावर कपाळफोडीची भाजी उपयुक्त आहे.

या सर्व भाज्या खायला रुचकर असतात. नैसर्गिक पद्धतीने उगवल्याने त्या आरोग्यासाठी देखील चांगल्या असतात. त्यामुळे पावसाळ्या बरोबर येणारा हा रानमेवा चुकवू नका. पुढच्यावेळी बाजारात जाल तेव्हा या भाजांची नक्की चौकशी करा आणि त्याचा आस्वाद घ्या.

First Published on: July 8, 2018 2:46 PM
Exit mobile version