थंडीत बच्चे कंपनीसाठी बनवा गाजराचा पराठा

थंडीत बच्चे कंपनीसाठी बनवा गाजराचा पराठा

हिवाळा सुरू झाला असून या सिझनमध्ये बाजारात मुबलक प्रमाणात पालेभाज्यांबोरबरच फळभाज्याही मिळतात. विशेष करून थंडीत बाजारात येणारी लाल-केशरी रंगाची गाजर टेस्टी असतात. तसेच गाजरामध्ये व्हिटामीन -A चे प्रमाण भरपूर असल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

 

तसेच गाजरं खाल्ल्याने रोग प्रतिकारकशक्तीही वाढते आणि कोलॅस्ट्रॉलही नियंत्रणात राहते. यामुळे आहारात गाजराचा समावेश नक्की करावा. गाजरापासून अनेक रेसिपी बनवता येतात. अशीच एक हटके रेसिपी आहे गाजर पराठा. गाजर आरोग्य वर्धक असल्याने लहान मुलांना टिफीनसाठीही गाजर पराठे उत्तम पर्याय आहे.

साहीत्य- चार मध्यम आकाराचे लाल गाजर, दोन कप गव्हाचं पीठ, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा कांद्याच्या बिया, पाव चमचा ओवा, मीठ चवीनुसार आणि तूप किंवा तेल.

कृती- सर्वप्रथम सर्व गाजर किसून घ्या. किसलेले गाजर एका पातेल्यात टाका. त्यात गव्हाचं पीठ आणि सर्व जिन्नस टाकून मिश्रण चांगल मळून घ्या. दहा मिनिटांनंतर त्याचे पराठे मध्यम जाडसर लाटा. गरम तव्यावर तूप टाकून खरपूस भाजा. हिरव्या चटणीबरोबर गाजर पराठे टेस्टी लागतात. या मिश्रणापासून पराठ्यांसह पुऱ्याही बनवता येतात.

 

 

First Published on: December 30, 2022 3:28 PM
Exit mobile version