संपर्कातील प्रत्येकाशी असावे असे नाते

संपर्कातील प्रत्येकाशी असावे असे नाते

या जगातली अनेक नाती ही गरजेवर चाललेली आहेत. असं म्हटलं तर फारशी अतिशयोक्ती वाटणार नाही. म्हणजे आपल्याला जेवढी गरज आहे तेवढंच एखाद्याला जवळ करणं किंवा तेवढं त्याला लांब ठेवणं अशी अनेक उदाहरणं आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. प्रत्येकवेळी त्यात कुणाचा स्वार्थ असतोच, असंही नाही. पण तरीही लोक गरजेनुसारच वागत असल्याचं दिसतं. अगदी सोप्प उदाहरण द्यायचं झालं तर, थंडी पडली की लोक सुर्याची आतुरतेने वाट पाहतात आणि उन्हाळा असताना कधी एकदा सावली मिळते किंवा सूर्य अस्ताला जातो याची वाट पाहिली जाते.

अशा वागण्याची चिड येत असेल तर निदान हे असं आपण कधीही वागू नये. याची काळजी स्वत:पुरती आपण घेऊ शकतो ना? गरजेसारखा काहीही विषय नसताना आपण लोकांशी व्यवस्थित बोलले पाहिजे, त्यांच्याशी नीट वागलं पाहिजे आणि काहीच गरज नसतानाही काम नसतानाही संबंध चांगले ठेवले पाहिजेत, हा खरा चांगुलपणा. आपली गरज असेल तेव्हा तर लोकांना आपली किंमत कळावीच; पण, आपल्याशी स्नेहसंबंध असतानाही आपला स्वभाव लोकांना आवडला पाहिजे, असे नेहमी आपले प्रयत्न हवेत.

समोरचा माणूस कोणीही आणि कोणत्याही कारणाने आपल्यासोबत आलेला असतो, त्याच्याशी मैत्री अशी करावी की जणू सगळं जग आपलंसं होईल. आपण स्वत: देखील माणूस असं बनावं की, त्यापुढे अगदी माणुसकीही नतमस्तक व्हावी. आपण स्वत:च इतकं प्रेम करावं की, सारं जग आपल्यामुळेही किंवा आपल्याकडे पाहूनही प्रेमळ होईल. गरज असताना- नसतानाही एकमेकांना असं सहकार्य करावं की आपल्या आयुष्याचं सार्थक व्हावं.

First Published on: November 21, 2018 5:46 AM
Exit mobile version