छातीतील वेदना असू शकतात हृदयाच्या रक्तवाहिनीचा आजार

छातीतील वेदना असू शकतात हृदयाच्या रक्तवाहिनीचा आजार

प्रातिनिधिक फोटो

अंजायना म्हणजे छातीच्या मध्यभागी, ब्रेस्टबोनच्या खाली, होणाऱ्या वेदना. काही जणांना या वेदना जबड्याखाली किंवा डाव्या खांद्यात जाणवू शकतात. या वेदना सहसा शारीरिक श्रमानंतर जाणवतात. शंभरेक मीटर चालल्यानंतर, पोहल्यानंतर, सायकल चालवल्यानंतर वगैरे काही जणांना छाती जड झाल्यासारखे वाटते. छातीवर काहीतरी जड वजन ठेवल्यासारखे वाटते. काही जणांना केवळ धाप लागते. खूप घाम येतो. छातीत वेदना होण्यामागे अनेक कारणे आहेत. या वेदना केवळ पित्तामुळेही (अॅसिडिटी) होऊ शकतात. अगदी अॅसिडिटीसारखे साधे कारणही यामागे असू शकते असा सल्ला हदयविकार शल्यचिकीत्सक डॉ.बिपीनचंद्र भामरे यांनी सांगितले आहे.

असू शकतो कार्डिओव्हस्क्युलर विकाराचा इशारा

अँटासिड घेतल्यानंतर काही मिनिटांतच अॅसिडिटीमुळे होणाऱ्या वेदना थांबतात. काहीवेळा मात्र या वेदनांचा अर्थ केवळ अपचनाहून अधिक धोकादायक असू शकतो. अंजायना म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी पडत असल्याने छातीत होणाऱ्या वेदना. या वेदना अॅसिडिटी/गॅस्ट्रोएसोफागिअल रिफ्लक्स आजारांत होतात तशाच असतात; त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अंजायना हा दबा धरून बसलेल्या कार्डिओव्हस्क्युलर विकाराचा इशारा असू शकतो.

ही आहेत लक्षणे

अंजायनामध्ये अस्वस्थता/छातीत वेदना जाणवतात त्या हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे. याचा परिणाम म्हणून पुढे हृदयाच्या स्नायूंमधील बळ कमी होते. रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे वेदना निर्माण होतात. बहुतेकदा रुग्ण छातीभोवती काहीतरी आवळल्यासारखे वाटल्याची तक्रार करतात. हे खांदे, हात, काहीवेळा जबड्यामधील वेदनांबाबतही होते. तणाव किंवा शारीरिक श्रमांमुळे या वेदना वाढतात आणि काही मिनिटे विश्रांती घेतल्यानंतर वेदना कमी होतात. अंजायनाच्या अटॅकची आणखी काही लक्षणे म्हणजे अस्वस्थ वाटणे/मळमळणे, धाप लागणे, पोटात वेदना होणे, अचानक थकल्यासारखे वाटणे.

First Published on: March 29, 2019 2:30 PM
Exit mobile version