असा तयार होतो ‘मोती’!

असा तयार होतो ‘मोती’!

Moti

ऑयस्टरच्या माध्यमातून सुंदर मोती तयार होतो. त्याच्या अंगामध्ये एक आगंतुक पदार्थ प्रवेश करतो, तेव्हा त्या पदार्थापासून स्वत:ला कोणतीही इजा पोहोचू नये, यासाठी तो त्या पदार्थाला ‘नेकर’ (nacre) मध्ये गुंडाळून ठेवतो. यालाच आपण मोती म्हणतो. आपल्या सर्वांनाच मोतीचे आकर्षण असते. त्यातही प्युअर मोती पाहायला मिळणे दुर्मिळच. आभुषणांमध्येही मोतींचा वापर केला जातो. परंतु मोती आणि इतर अलंकारिक घटकांच्या उगमाबाबत मात्र फार मोठा फरक आहे. सोन्याचा किंवा हिर्‍यांचा उगम पृथ्वीच्या पोटामध्ये होतो. तर मोत्यांचा ऑयस्टरच्या शिंपल्यांमध्ये. ऑयस्टर सुंदर मोती बनवतो.

ऑयस्टर हा मॉल्युस्क या प्रकारातील प्राणी आहे. जो मोती निर्माण करू शकतो. पण फक्त ऑयस्टरच मोती बनवू शकतो, असं नाही. क्लॅम आणि मुस्सेलसारखे मॉल्युस्कसुद्धा मोती तयार करू शकतात. पक्ष्यांचे जसे दोन पंख असतात तसेच ऑयस्टरच्या दिमतीला दोन फ्लॅप असतात. ज्याची एका बाजूने तो उघडझाप करत असतो. जसजसा हा प्राणी मोठा होत जातो. तसतसा त्याला सुरक्षित ठेवणारा शिंपलाही मोठा होत जातो. ऑयस्टरच्या आंतरिक देहात मँटल हा एक अवयव असतो. जो त्याच्या अन्नातून मिळालेल्या घटकापासून शिंपला बनवतो. मँटल जो पदार्थ बनवतो त्यालाच ‘नेकर’ म्हणतात. शिंपल्याच्या आतील बाजूस ज्या वलयांकित पट्ट्या दिसतात, त्या नेकरपासूनच तयार झालेल्या असतात.

एखादा बाह्यघटक- वाळूचे कण, सूक्ष्मजीव किंवा इतर पदार्थ, मँटल आणि शिंपल्यातील पोकळ भागात जाऊन विसावतात. तेव्हा नैसर्गिकरित्या मोती बनण्याची प्रक्रिया सुरू होते. अशा घटकांचा प्रवेश आतमध्ये झाल्यानंतर त्या घटकांना बाहेर काढणं ऑयस्टरला जमत नाही. त्यामुळे आतमध्येच ते ठसठसत राहतात. यामुळे हैराण होऊन तो त्या सूक्ष्मजीवाला नेकरच्या माध्यमात जखडून ठेवतो. तो कालांतराने सुंदर मोत्याचं रूप घेतो.

First Published on: January 21, 2019 5:47 AM
Exit mobile version