चष्मिश आहात तरी स्टायलिश दिसा !

चष्मिश आहात तरी स्टायलिश दिसा !

Spectacles

आपली ओळख आपल्या व्यक्तिमत्वामुळे होत असते. तुमच्या व्यक्तिमत्वात तुमचे राहणीमान, दिसणे आणि देहबोली अधिक परिणामकारक ठरत असते. यामध्ये तुमचे डोळे बोलके असतील, तर समोरच्या व्यक्तीशी सहज संवाद साधता येतो, परंतु तुम्हाला चष्मा असेल आणि त्यामुळे तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य कमी झाले असे वाटत असेल तर काही टिप्स खास तुमच्यासाठी-

तुमच्या चेहर्‍याच्या आकारानुसार तुमच्या भुवया असाव्यात. चष्म्याच्या फ्रेमची स्टाईल विचारात घेऊन भुवयांचा आकार नेटका ठेवा. भुवयांचा आकार योग्य असेल तर तुम्हाला चष्मा असला तरी तुमचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल.

रोजच्या साध्या मेकअपमध्ये डोळ्यांना लायनर लावल्यास डोळे सुरेख दिसण्यास मदत होईल. चष्म्याच्या फ्रेमनुसार लायनरचा आकार जाड किंवा बारीक ते ठरवा. पातळ आणि फ्रेमलेस चष्मा असेल, तर तुमच्या डोळ्यांना नाजूक बारीक लायनर लावा. यामुळे तुमच्या डोळ्यांना वेगळा लूक मिळेल.

चष्मा असल्यास लगेच डोळे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे डोळ्यांना लाईट मेकअप करा. यामध्ये हलके आणि तुम्हाला आवडेल अशा आयशॅडोच्या शेडचा वापर करा. ही शेड निवडताना तुमच्या चष्म्याच्या फ्रेमचा आकार आणि रंग याचादेखील विचार करा. अतिभडक किंवा चमकणारे आयशॅडो तुमचा लूक बिघडवू शकतात.

चष्म्याशिवाय तुम्हाला वावरणं शक्य नसेल किंवा त्याची सवय असेल तर समारंभास आणि पार्टीलादेखील चष्मा घालावा लागतो. चष्मा असेल, तर तुम्ही खास लूक पार्टीसाठी करू शकता. पार्टीसाठी जाताना तुम्ही डोळ्यांचा छान मेकअप करून ग्लॉसी लिपस्टिक लावू शकता. थोडं जाड लायनर लावलं की तुम्ही पार्टीसाठी तयार. स्मोकी आइज आणि लाइट शिमर तुमचं रूप आणखी खुलवण्यास मदत करेल.

तुम्हाला चष्मा असेल आणि अशा काही टिप्सचा वापर तुम्ही केला तर तुमचे व्यक्तिमत्त्व आणि सौंदर्य अधिक खुलून दिसेल.

First Published on: February 24, 2019 4:52 AM
Exit mobile version