चेहर्‍याप्रमाणे निवडा टिकली

चेहर्‍याप्रमाणे निवडा टिकली

कपाळावर टिकली लावली नाही तर भारतीय शृंगार अर्धवट वाटतो असे म्हणायला हरकत नाही. टिकली लावल्यावर परंपरा तर झळकतेच चेहर्‍यात गोडावाही येतो. सण-उत्सवामध्ये महिला पोशाखाला (साडी) जितके महत्व देता तितकेच त्यावर मॅचिंग ज्वेलरी, बांगड्यांनादेखील देतात. यासोबत आणखी एका गोष्टीला महत्व देतात आणि ती म्हणजेच कपाळावर लावण्यात येणारी टिकली. एरवी घरी असताना अगदी साधी गोल आकाराची टिकली लावली जाते. पण सण-उत्सवानुसार फॅशनेबल टिकल्यांची निवड केली तर तुमच्या पेहरावाची शोभा आणखीनच वाढेल. आपल्या चेहर्‍याच्या शेपप्रमाणे टिकलीची निवड केल्यास तुमची सुंदरता देखील अजूनच वाढेल. पाहुयात चेहर्‍यांच्या शेपनुसार कुठल्या प्रकारच्या टिकल्या लावाव्यात ते.

राउंड शेप चेहरा

गोल चेहर्‍यावर लांब टिकल्या खूप उठून दिसतात. मोठी गोल टिकली लावणे टाळावे कारण अशात चेहरा अजून लहान दिसतो.

ओव्हल शेप चेहरा

हा शेप असलेल्या महिलांचे कपाळ आणि हनुवटी एकाच प्रमाणात असतात आणि गालाची हाडे उभारलेली असतात. या शेपवर कोणत्याही प्रकाराची टिकली सूट करते. तरी ओव्हल शेप चेहर्‍यावर लांब टिकली तेवढी काही जमत नाही कारण अशात चेहरा अजून लंबुळका दिसतो.

स्क्वेअर शेप चेहरा

कपाळ, गालाचे हाडं आणि जबडा एकाच रुंदी असल्यास आपल्यावर गोल किंवा व्ही आकाराची टिकली उठून दिसेल. इतर भूमिती आकाराची टिकली लावणे टाळा कारण यामुळे आपला चेहरा विचित्र दिसू शकतो.

हार्ट शेप चेहरा

उभारलेले गाल, टोकदार हनुवटी आणि रुंद कपाळ. अर्थातच आपल्या चेहरा हार्ट शेप घेतलेला आहे. अशात बारीक डिझाइन किंवा लहान टिकली लावायला हवी. मोठी टिकली लावल्याने कपाळ अजून मोठं दिसेल.

ट्राएंगल शेप चेहरा

टोकदार हनुवटी आणि मजबूत जबड्यासह लहान कपाळ. अशा चेहर्‍यावर लहान किंवा डिझाइनर टिकली छान दिसते. या शेपवर कोणत्याही शेपची टिकली छान दिसते. तरी टिकली निवडण्यापूर्वी प्रसंग आणि ड्रेसला मॅच करणे योग्य ठरेल.

First Published on: September 16, 2018 2:53 AM
Exit mobile version