तिशीनंतर आई होताना… (भाग -2)

तिशीनंतर आई होताना… (भाग -2)

Pregnancy

उशिराने झालेल्या गरोदरपणात भारतीयांमध्ये न्युरल ट्युब डिफेक्ट तसेच डाऊन सिंड्रोम याचे प्रमाण अधिक आढळून येते. वाढत्या वयामुळे स्त्रियांमधील थायरॉईड नियंत्रित नसल्याने अनेक धोके निर्माण होऊ शकतात. गरोदरपणातील रक्ताची समस्या असल्यास बाळाची वाढ खुंटण्यासारखे परिणाम पहायला मिळत असून, सहाव्या, सातव्या महिन्यात रक्तदाब वाढल्याने फिटदेखील येऊ शकते. त्यामुळे हेल्प सिंड्रोम होऊ शकतो आणि माता दगावण्याचीही शक्यता असते.

वाढत्या वयानुसार फर्टीलिटी कमी झाल्याने गर्भपिशवीत तयार होणार्‍या अंड्यांची संख़्या कमी होते. त्यामुळे तुम्ही जितका उशीर कराल तितके तुम्ही इन्फरलिटीकडे अधिक झुकाल. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर तयार होणार्‍या अंड्यांची क्षमतादेखील खालावते, तसेच वयाचा विशिष्ट टप्पा पार केल्यानंतर शरीरात होणार्‍या बदलांमुळे बाळ होण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.

आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सोयीसुविधांमुळे बाळाचा विचार करण्यामध्ये वय हा अडथळा येण्याची शक्यता कमी झाली आहे, परंतु बाळामध्ये काही जन्मजात दोष निर्माण होण्याची शक्यता कमी होत नाही. डाऊन सिंड्रोमसारख्या जेनेटीक आजारांप्रमाणेच गर्भपात होण्याची शक्यताही वाढते. अनेक केसेसमध्ये गर्भारपणाचा निर्णय उशिरा घेणे हे बाळाला डाऊन सिंड्रोम जडण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरले आहे.

महिलेचे वय जसजसे वाढत जाते, तसे आई व बाळ या दोन्हींसाठी गर्भावस्थेशी संबंधित गुंतागुंत व आरोग्यविषयक प्रश्न वाढत जातात. वयानुसार अंड्यांची संख्या व गुणवत्ता घटू लागली की नैसर्गिकपणे गर्भधारणा होण्याचे स्वप्न धूसर होऊ लागते. त्यामुळे कुटुंबात मानसिक ताण व चिंता वाढत जाते.लांबलेल्या गर्भावस्थेच्या बाबतीतील एक सर्रास आढळणारा धोका म्हणजे शेवटपर्यंत गर्भावस्था टिकून राहणे. तिशीच्या अखेरीस गर्भधारणा झालेल्या अनेक महिलांमध्ये शरीरातील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे किंवा इतक्या वर्षांत विकसित झालेल्या असाधारण स्थितीमुळे गर्भपात होण्याची भीती अधिक असते. त्यामुळे लांबवलेल्या गर्भधारणेत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

निरोगी गरोदरपणासाठी
* वय वर्षे 35 असताना डॉक्टर तुम्हाला अ‍ॅडव्हान्स्ड मॅटर्नल एज असे संबोधतील आणि केवळ तुमच्या वयावर आधारित तुम्हाला उच्च जोखीम असलेल्या समजतील.

* वाढलेला एक धोका म्हणजे गर्भपाताची शक्यता, हा धोका विशीतील महिलांसाठी 15 टक्के असतो, पण 40 व्या वर्षी तो 25 ते 30 टक्के इतका वाढलेला असतो.

* वय वाढलेल्या महिलांमध्ये उच्च रक्तदाब, गर्भधारणे दरम्यान मधुमेह, हृदयाचे आजार, प्लॅसेंटा फाटणे, प्रीक्लॅम्प्शिया आणि झटके यांची प्रवृत्ती वाढते.

* जास्त वयाच्या आईला लवकर प्रसूती आणि लांबलेल्या प्रसूतीवेदना, सिझेरियन प्रसूती आणि जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी असणे यांचा अनुभव येण्याची शक्यता अधिक असते.

* गर्भधारणेसाठी ज्या महिला जननक्षमतेचे उपचार घेतात त्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त गर्भ राहण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे गरोदरपणात संभाव्य गुंतागुंती वाढतात. जननक्षमतेचे उपचार घेतलेले नसतील तरीही जास्त वयाच्या मातांमध्ये जुळी किंवा तिळी होण्याचे प्रमाण अधिक असते.या शक्यता असल्या तरी तुमच्या वयामुऴे तुम्हाला या सगळ्या स्थितीचा अनुभव येईलच असे काही नाही. प्रगत वैद्यकीय निगेमुळे या स्थितीवर यशस्वीरित्या मात करणे शक्य होते.

– डॉ. गंधाली देवरुखकर, स्त्री रोग विशेषज्ञ

First Published on: February 25, 2019 4:32 AM
Exit mobile version