World Brain Tumor Day 2023: वारंवार डोकेदुखी, चक्कर येते? व्हा सावध

World Brain Tumor Day 2023: वारंवार डोकेदुखी, चक्कर येते? व्हा सावध

World Brain Tumor Day 2023: ब्रेन ट्यूमर हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. ब्रेन ट्यूमरची लक्षणे सहज ओळखता येत नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेक लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण वारंवार डोकेदुखी आणि चक्कर येणं, ही ब्रेन ट्यूमरच्या लक्षणांपैकी एक आहे. त्यामुळे डोकेदुखी सतत जाणवत असल्यास वेळीच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेन ट्यूमरचं निदान खूप कठीण असतं. बऱ्याचदा ब्रेन ट्यूमर जीवघेणा ठरू शकतो. या आजाराची लक्षणं संभ्रम निर्माण करणारी असतात. उदाहरणार्थ, वारंवार डोकेदुखी आणि समन्वयाच्या अभावाची समस्या ही ब्रेन ट्यूमरची दोन सामान्य लक्षणं असू शकतात. प्रौढ व्यक्ती आणि लहान मुलांमध्ये ब्रेन कॅन्सरची लक्षणं वेगवेगळी असतात.

डोक्याच्या आकारात अल्पसा बदल, अति तहान लागणं, वारंवार लघवीला जाणं, सातत्यानं किंवा तीव्र डोकेदुखी, चव आणि वास समजण्यास अडचण येणं, दृष्टी अंधूक होणं, चक्कर येणं, थकवा येणं, जुलाब आणि उलट्या होणं ही लहान मुलांमध्ये दिसणारी ब्रेन कॅन्सरची लक्षणं आहेत. तर तीव्र डोकेदुखी, चक्कर येणं, झटका येणं, अनुवांशिकता, मळमळ होणं, जुलाब किंवा उलटी होणं, बोलताना अडचण जाणवणं, स्मरणशक्तीशी संबंधित समस्या निर्माण होणं, चव आणि वास समजण्यात अडचणी येणं, हातापायाला मुंग्याला येणं ही ब्रेन कॅन्सरची लक्षणं प्रौढ व्यक्तींमध्ये दिसून येतात.

मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. अमित शोभावत म्हणाले की, ‘‘बऱ्याच डोकेदुखीकडे लोक दुर्लक्ष करतात. परंतु, वारंवार होणारी डोकेदुखी ब्रेन ट्यूमरच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. वाढत्या मेंदूतील गाठीमुळे मेंदूजवळील निरोगी पेशींवर अतिरिक्त दबाव पडतो तेव्हा डोकेदुखी जाणवते. टयूमरमुळे मेंदूला सूज येऊ शकते. याशिवाय पहाटे उठल्यावर डोकेदुखी वाढते. काही लोकांना झोपेच्या वेळी डोकेदुखी होऊ शकते. आणि त्यांना मायग्रेनच्या वेदनासारखे वाटू शकते. डोक्याच्या मागच्या बाजूला असलेल्या ब्रेन ट्यूमरमुळे डोकेदुखी आणि मान दुखते. अशी समस्या असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.’’

झायनोव्हा शाल्बी मल्टीस्पेशालिटी रूग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. आकाश छेडा म्हणाले की, ‘‘डोकेदुखीसह चक्कर येणं हे सुद्धा ब्रेन ट्यूमरचं एक लक्षणं आहे. मेंदूतील गाठीमुळे डोकेदुखी असहनीय होते. ही डोकेदुखी अनेक दिवस राहते. डोकेदुखीमुळे मळमळ, उलट्या, अस्वस्थ वाटणे, बोलता न येणं आणि शरीराच्या एका बाजूला सून्न किंवा अशक्तपणा जाणवणं हे देखील ब्रेन ट्यूमर चे लक्षण आहे. त्यामुळे अशी काही लक्षणं दिसून आल्यास लगेचच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एमआरआय, सीटीस्कॅन, पीईटी-सीटी स्कॅन आणि टयूमरची बायोमार्कर चाचणी करून घ्यावी. वेळीच निदान व उपचार झाल्यास रूग्ण लवकर बरा होऊ शकतो. ब्रेन ट्युमरवर तात्काळ शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपीद्वारे उपचार उपलब्ध आहे.”(World Brain Tumor Day 2023)

नवी मुंबईतील मेडिकल रूग्णालयातील सल्लागार न्यूरोसर्जन डॉ. हरीश आर नाईक म्हणाले की, ‘‘मेंदूमध्ये ट्यूमर असलेल्या व्यक्तींमध्ये सामान्यतः डोकेदुखीची लक्षणे दिसून येतात. मेंदूतील ट्यूमरच्या वाढीमुळे सभोवतालच्या निरोगी पेशींवर दाब येऊन डोकेदुखी सतावू शकते. डोक्याच्या मागच्या भागात असलेल्या ब्रेन ट्यूमरमुळे मानदुखीसह डोकेदुखी होऊ शकते. जर मेंदूची गाठ डोक्याच्या पुढच्या भागात झाली तर डोके दुखणे किंवा सायनसचा त्रास जाणवतो. परंतु काही ब्रेन ट्यूमरमुळे डोकेदुखी होत नाही. त्यामुळे ब्रेन ट्यूमरचं निदान पटकन होत नाही. वेळीच निदान व उपचार न झाल्यानं आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे डोकेदुखी व्यतिरिक्त मळमळणे, उलट्या होणे, झोपेसंबंधीच्या समस्या आणि विसर पडणे, चक्कर येणे, मूड स्विंग्ज, चालताना तसेच बोलताना अडचणी येणे किंवा ऐकू न येणे, दृष्टी आणि गंध बदलणे, संतुलन गमावणे, भावनिक अस्थिरता आणि अन्न गिळताना येणाऱ्या समस्या जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण ही सुद्धा ब्रेन ट्यूमरची लक्षणं आहेत.”


हेही वाचा- सोमवारीच येतो जीवघेणा हार्ट अटॅक, संशोधनातून माहिती समोर

First Published on: June 8, 2023 7:41 AM
Exit mobile version