सरपंचच काय? तर मुख्यमंत्रीसुद्धा जनतेतूनच निवडायला हवा: अण्णा हजारे

सरपंचच काय? तर मुख्यमंत्रीसुद्धा जनतेतूनच निवडायला हवा: अण्णा हजारे

राज्यात सरपंच निवडीच्या पद्धतीवरुन राजकारण पेटलं असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याबद्दल भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडून देण्याची पद्धत बंद करुन थेट जनतेतूनच सरपंच निवडण्याची पद्धत सुरु केली होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सरकारने ही पद्धत बंद करुन ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अध्यादेश काढण्यास नकार दिल्याने सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. यामुळेच सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष होत असल्याने सरपंच निवडीची योग्य पद्धत कोणती? यावरुन राज्यात मंथन सुरु आहे.

काय म्हणाले अण्णा?

आपल्या विविध आंदोलनांद्वारे चर्चेत असणारे अण्णा हजारे यांनी मात्र थेट निवड पद्धतीस पाठिंबा दर्शवला आहे.  “महाराष्ट्र सरकार ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्फत सरपंच निवडीचा विचार करीत आहे. असं केल्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण होऊन हुकूमशाही येण्याची शक्यता आहे. निवडून दिलेल्या सदस्यांनीच सरपंच निवडावा हे खरे विकेंद्रीकरण नव्हे. मतदारांच्या हाती अधिकार असावेत. अन्यथा पक्ष आणि पार्टीशाही होईल. ती पद्धती लोकशाहीला मारक ठरेल. त्यामुळे खऱ्या लोकशाहीसाठी सरपंच गावांनीच निवडावा. एवढेच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा मतदारांनी निवडून पाठवले पाहिजेत. तेव्हा लोकांची, लोकांनी, लोक सहभागातून चालविलेली लोकशाही येऊ शकेल. त्यामु‌ळे सकाळी आठ वाजता शपथविधी घेण्याची वेळ येणार नाही किंवा वेगवेगळ्या हॉटेलमध्ये काही राजकारण्यांना राहण्याची गरज पडणार नाही,’ असंही ते म्हणाले.

First Published on: February 24, 2020 7:03 PM
Exit mobile version