अपघातग्रस्त एसटी बसमधील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून १० लाखांची मदत

अपघातग्रस्त एसटी बसमधील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून १० लाखांची मदत

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये एसटी महामंडळाची बस बुडून १५ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटी महामंडळातर्फे प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत देण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. (10 lakhs help from the Chief Minister to the families of the deceased in the ST bus accident)

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये सोमवारी सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, “बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर तातडीने उपचार व्हावे यासाठी मध्य प्रदेशातील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा”, असेही निर्देशही जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या आहेत. त्यानुसार, बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय, मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.

जळगावात नियंत्रण कक्ष स्थापन

दरम्यान, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. याबाबत जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७२२२३१८० आणि ०२५७२२१७१९३ असा आहे.

लोकांना सुरक्षित वाचविण्यात यश : देवेंद्र फडणवीस

“इंदोर-अमळनेर ही ST बस मध्यप्रदेशातील धार येथे पुलावरून नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. काही लोकांना सुरक्षित वाचविण्यात यश आले आहे. बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत. मी सुद्धा धार जिल्हाधिकारी आणि ST प्रशासनाशी संपर्कात आहे. शोध आणि बचावकार्य वेगाने केले जात आहे. जखमींना लवकर आराम मिळो, अशी मी प्रार्थना करतो”, असे उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत लिहिले आहे.

“मध्य प्रदेशातील धार येथे घडलेली बस दुर्घटनेची घटना दु:खद आहे. ज्यांनी आपली जवळची माणसं गमवली आहेत, त्यांच्यासोबत माझे विचार आहेत. बचावकार्य सुरू आहे आणि स्थानिक अधिकारी बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहेत”, असे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवारांकडून मध्यप्रदेशातील बस दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त

“महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदूर-अमळनेर बस आज सकाळी मध्यप्रदेशातील खलगाट व ठिगरी दरम्यान पुलावरुन नर्मदा नदीत कोसळून झालेला अपघात तसेच अपघातात काही प्रवासी मृत्युमुखी पडल्याचे वृत्त क्लेशदायक आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून बचाव व मदतकार्य गतिमान करण्याच्या, जखमी प्रवाशांना आवश्यक वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. जळगाव जिल्हा प्रशासनानेही अपघातग्रस्तांना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक मदत उपलब्ध करुन द्यावी. बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियाबद्दल शोकसंवेदना व्यक्त करत जखमी प्रवाशांची प्रकृती लवकर सुधारावी”, अशी प्रार्थनाही अजित पवार यांनी केली आहे.


हेही वाचा – बुडत्याला काडीचा आधार, शिंदेसरकारच्या मंत्रिमंडळावर क्लाईड क्रास्टोंचा हल्लाबोल

First Published on: July 18, 2022 1:59 PM
Exit mobile version