दहावी-बारावीचा निकाल लांबण्याची चिन्हे

दहावी-बारावीचा निकाल लांबण्याची चिन्हे

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मागील चार दिवसांपासून संपावर गेलेले शासकीय-निमशासकीय कर्मचारी तसेच शिक्षकांच्या संपाचा फटका उत्तरपत्रिका तपासणीलाही बसत आहे. कर्मचार्‍यांचा संप कायम राहिल्यास दहावी-बारावी परीक्षेच्या ७५ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहावी-बारावी बोर्डाचा निकाल लांबण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती बोर्डाच्या सूत्रांनी दिली आहे.

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून ती २० मार्चपर्यंत सुरू असणार आहे, तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरू झाली असून २५ मार्चपर्यंत सुरू असणार आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपकाळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा पवित्रा राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीने घेतला आहे. हे शिक्षक केवळ बारावीच्या परीक्षाविषयक कार्य करीत आहेत. इतर कोणतेही कार्य करणार नाहीत, असेही समितीने स्पष्ट केले आहे.

दरवर्षीच्या नियोजनाप्रमाणे बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात जाहीर होणे अपेक्षित असते, परंतु संपकाळात उत्तरपत्रिका तपासून न झाल्यास निकाल लागण्यासाठी किमान एक आठवड्याचा विलंब होऊ शकतो, अशी माहिती बोर्डातील सूत्रांनी दिली आहे.

First Published on: March 18, 2023 5:00 AM
Exit mobile version