दहावीच्या परीक्षा रद्द, पदवी परीक्षा ऑनलाईन मात्र शिष्यवृत्ती परीक्षा ऑफलाईन होणार!

दहावीच्या परीक्षा रद्द, पदवी परीक्षा ऑनलाईन मात्र शिष्यवृत्ती परीक्षा ऑफलाईन होणार!

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिली ते दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र, 23 मे 2021 रोजी घेण्यात येणारी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यावर राज्य सरकार ठाम आहे. काही हजार रुपयांच्या असलेल्या शिष्यवृत्तीसाठी मुलांचा लाखमोलाचा जीव सरकारकडून धोक्यात घालण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे मुलांच्या सुरक्षा महत्वाची असल्याचे सांगायचे तर दुसरीकडे स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली लहान मुलांच्या जीवाशी खेळ मांडायचा प्रकार सरकारकडून चालवला आहे.

विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर त्यांची गुणवत्ता कळावी, त्यांना स्पर्धा परीक्षांची सवय व्हावी, त्याच्यामध्ये झटपट निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी या अनुषंगाने दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या पाचवीच्या विद्यार्थ्याला दरवर्षी हजार रुपये तर आठवीच्या विद्यार्थ्याला दीड हजार रुपये असे तीन वर्षे शिष्यवृत्ती मिळते. या परीक्षेला दरवर्षी राज्यातून लाखो विद्यार्थी बसतात. यंदा 23 मे रोजी होणार्‍या शिष्यवृत्ती परीक्षेला राज्यातील 47 हजार 612 शाळांमधून तब्बल 6 लाख 32 हजार 861 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेवर विद्यार्थ्यांचे मेरिट अवलंबून नसते. त्यामुळे पुढील परीक्षांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही.

विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा पाया समजली जाणारी दहावीची परीक्षा रद्द केली जाऊ शकते तर शिष्यवृत्तीची परीक्षा रद्द करण्यास काय हरकत आहे, अशी विचारणा पालकांकडून करण्यात येत आहे. वाढत्या कोरोनामुळे पहिली ते दहावीची परीक्षा रद्द केली तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली. एमपीएससीची परीक्षाही पुढे ढकलली होती. एमपीएससीची परीक्षा देणारे विद्यार्थी साधारणपणे 25 वर्षांवरील असतात. या परीक्षेला विद्यार्थ्यांची संख्या ही हजाराच्या घरात असते. ते स्वत:ची काळजी घेऊ शकतात.

तरीही विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्वाची असल्याचे सांगत सरकारने परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. शिष्यवृत्ती परीक्षा देणारे पाचवीचे विद्यार्थी 11 वर्षांचे तर आठवीचे विद्यार्थी 14 वर्षांचे असूनसुद्धा ही परीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे खरेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी सरकारला आहे का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेबाबतच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बोटचेपी भूमिका का घेत आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून शिक्षणमंत्री विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालत असल्याबद्दल पालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

दहावी, बारावीच्या परीक्षेला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असतात. या परीक्षा महिनाभर चालतात. मात्र, शिष्यवृत्तीची परीक्षा एकच दिवस असल्याने ती घेणे शक्य आहे. परीक्षा घेण्यासंदर्भात आमची सर्व तयारी आहे. त्यामुळे नियोजित तारखेला शिष्यवृत्तीची परीक्षा होणारच, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी सांगितले. मात्र, परीक्षेदरम्यान कोरोना रुग्णसंख्या वाढत असेल तर त्यावेळी परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात येईल. मात्र, परीक्षा रद्द होणार नसल्याचेही सुपे यांनी सांगितले.

शिष्यवृत्ती परीक्षेला नोंदणी केलेले विद्यार्थी
मुले -मुली -एकूण
पाचवी 183758 -204766 -388524
आठवी 106551- 137786 -244337

दहावीची परीक्षा न घेतल्याने काही बिघडत नाही तर शिष्यवृत्तीच्या परीक्षेने विद्यार्थ्यांचे काय बिघडणार आहे. एक वर्ष परीक्षा न घेतल्याने मुलांचे काहीच नुकसान होणार नाही. त्यामुळे ही परीक्षा जून-जुलैमध्ये घेण्यात यावी.
– प्रिया पेडणेकर, एक पालक

शिष्यवृत्तीची परीक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी आहे. ही परीक्षा अवघ्या दीड तासांची असते. परीक्षेला सहा लाख विद्यार्थी असले तरी परीक्षा केंद्र मोठ्या प्रमाणात असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून परीक्षा घेणे शक्य आहे. परीक्षा केंद्रावर सॅनिटायझर, थर्मल मीटर, ऑक्सिमीटरची व्यवस्था करूनच परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीची परीक्षा रद्द होणार नाही.
-तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

First Published on: April 28, 2021 4:15 AM
Exit mobile version