आजपासून १२ वीची परीक्षा

आजपासून  १२ वीची परीक्षा

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या एच.एस.सी (बारावी) बोर्डाच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. मंगळवारी या परीक्षेचा पहिला पेपर असून राज्यभरातून तब्बल १५ लाख ५ हजार ३९३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नाव नोंदणी केली आहे. दरम्यान, मुंबई विभागातून तब्बल ३ लाख ३९ हजार ०१४ विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून परीक्षेसाठी बोर्डाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे मुंबई विभागाचे सचिव संदीप संगवे यांनी दिली.

राज्य शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेला मंगळवा-रपासून सुरुवात होणार आहे. राज्यातील एकूण ३ हजार ३६ केंद्रांवर तर मुंबईतील ६०८ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्रांवर विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून काही परीक्षा केंद्रांवर ही भरारी पथके तिथेच बसून लक्ष ठेवतील, अशी माहिती मुंबई विभागाचे सचिव संदीप संगवे यांनी सोमवारी दिली. यंदा मुंबई विभागातून १ हजार ९१९ विद्यार्थी परीक्षा देत असून या विद्यार्थ्यांना कोणत्याही वैद्यकीय कारणाने काही विशेष सवलती हव्या असतील तर त्या नियमांनुसार तातडीने दिल्या जात असल्याची माहिती संगवे यांनी दिली.

याच्याशिवाय मागील वर्षीपासून त्यांच्या उत्तरपत्रिकांवर चिटकविण्यात येणार्‍या दिव्यांग स्टिकर्समुळे त्यांना अधिकची वेळ किंवा इतर सुविधा सहज उपलब्ध करून देता येणार आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षेला दिव्यांग विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारच्या सवलती दिल्या जातात. यात आता कालानुरुप बदल होऊ लागले असून त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली जाऊ लागली आहे. मागील वर्षी बारावीच्या एका विद्यार्थिनीने टॅबवरून परीक्षा दिली होती, तर यावर्षी एका दृष्टिहीन विद्यार्थिनीला बोलक्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून परीक्षा देण्यास मुभा देण्यात आली आहे. कांदिवली येथील टी.पी. भाटिया कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला शाखेतील भाव्या शहा या दृष्टिहीन विद्यार्थिनीला कॉम्प्युटरच्या माध्यमातून परीक्षा देण्यास मुभा मिळावी, अशी मागणी महाविद्यालयाने केली होती. ती मागणी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाने मान्य केली आहे.

First Published on: February 18, 2020 5:43 AM
Exit mobile version