CoronaVirus: धक्कादायक! राज्यात १३ कोरोनाबाधितांचा मृत्यू

CoronaVirus: धक्कादायक! राज्यात १३ कोरोनाबाधितांचा मृत्यू

महाराष्ट्रात करोना विषाणूंचा संसर्ग वाढत असून रविवारी तब्बल ११३ नवीन करोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ७४८ झाली असून रविवारीच १३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोना विषाणूंच्या संसर्गाने राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४५ झाली आहे. तर देशात ३५७७ करोनाग्रस्त रुग्ण असून त्यापैकी ८३ जणांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी राज्यात झालेल्या मृत्यूपैकी ८ जण मुंबईतील, ३ जण पुण्याचे तर प्रत्येकी १ रुग्ण कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद येथील आहे. रविवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६००८ नमुन्यांपैकी १४८३७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ७४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५६ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ४६,५८६ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३१२२ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे.

आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ७ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर एक जण हिंगोलीतील आहे. तर त्यांच्या निकटसहवासितांपैकी ५ जण पिंपरी चिंचवड येथे येथे करोना बाधित आढळले आहेत.

मृत व्यक्तिंची माहिती

1)कस्तुरबा रुग्णालयात डोंबिवली येथील एका ६७ वर्षीय महिलेचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. तिने परदेश प्रवास केलेला नव्हता. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार ही होते.

2)कस्तुरबा रुग्णालयात एका ६४ वर्षीय पुरुषाचा काल रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.

3)नायर रुग्णालयात एका ६२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.

4)के.ई.एम. रुग्णालय मुंबई येथे एका ६० वर्षीय पुरुषाचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. परदेश प्रवास केलेला नव्हता.

5) कस्तुरबा रुग्णालयात एका ५२ वर्षीय पुरुषाचा रविवारी रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला उच्च रक्तदाब , मधुमेह या आजारासोबत तो एचआयव्ही बाधितही होता.

6) क.े ई. एम. रुग्णालय मुंबई येथे एका ७० वर्षीय महिलेचा काल रात्री मृत्यू झाला. तिने परदेश प्रवास केलेला नव्हता. तिला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा जुनाट आजार होता त्यामुळे ती डायलिसीसवर होती.

7) चेंबूर येथील एका खाजगी रुग्णालयात एका ५५ वर्षीय पुरुषाचा काल रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केला नव्हता तथापि तो टॅक्सी ड्रायव्हर असल्याने अनेकदा तो प्रवासी वाहतूकीसाठी विमानतळावर येत – जात असे.

8) कस्तुरबा रुग्णालयात एका ७७ वर्षीय पुरुषाचा काल पहाटे मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.त्याला उच्च रक्तदाब , मधुमेह हे आजार होते.

9) चेंबूर येथील खाजगी रुग्णालयात ८० वर्षीय पुरुषाचा काल पहाटे मृत्यू झाला. या रुग्णाने परदेश प्रवास केलेला नव्हता. या रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब, अपस्मार अशा व्याधी होत्या. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झालेला होता.

10) करोना बाधित रुग्णाची निकट सहवासित असलेल्या ६० वर्षीय महिलेचा काल मध्यरात्री पुण्याच्या ससून रुग्णालयात मृत्यू झाला. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजारही होते.

11) पुण्याच्या ससून रुग्णालयात ५२ वर्षाच्या एका पुरुषाचा मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नाही. त्याला मधुमेहाचा त्रास होता.

12) औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी एका ५८ वर्षाच्या बँक अधिकार्‍याचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा त्रास होता. नजीकच्या काळात मुंबई वगळता त्यांनी कोठेही प्रवास केलेला नव्हता.

13) जिल्हा रुग्णालय औंध पुणे येथे आज दुपारी एका ७७ वर्षीय आत्यंतिक स्थूल असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. तिची नुकतीच पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती. शहरातील एका खाजगी रुग्णालयाने तिला संदर्भित केले होते.

First Published on: April 6, 2020 7:07 AM
Exit mobile version