16 लाख विद्यार्थ्यांची महिनाभरात कलचाचणी

कलचाचणी अ‍ॅप

गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि रोजगार यातील दरी कमी व्हावी यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल महत्त्वाचा असल्याने शिक्षण विभाग व श्यामची आई फाऊंडेशनमार्फत यावर्षी प्रथमच कल व अभिक्षमता चाचणी मोबाईलवर उपलब्ध करून दिली. महिनाभरात 9 लाख 70 हजार मोबाईलचा वापर करून तब्बल 16 लाख विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली आहे. मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून घेण्यात येणार्‍या चाचणीला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यात मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे, त्यानंतर पुणे आणि नाशिकचा क्रमांक लागतो.

शिक्षण विभागातर्फे तीन वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांची कल व अभिक्षमता चाचणी घेण्यात येत आहे. परंतु, विद्यार्थ्यांकडे कम्प्युटर व इंटरनेट समस्या असल्याने यावर्षी प्रथमच मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कलचाचणीला १८ डिसेंबर २0१८ पासून राज्यातील विविध शाळांमध्ये सुरुवात झाली. या कलचाचणीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिनाभरात तब्बल 16 लाख 1 हजार 886 विद्यार्थ्यांनी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून कल व अभिक्षमता चाचणी दिली. यामध्ये मुंबई आघाडीवर असून, मुबईतील तब्बल तीन लाख 41 हजार 901 विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली.

त्याखालोखाल पुण्यातील दोन लाख 69 हजार 234 विद्यार्थ्यांनी तर नाशिक तिसर्‍या क्रमांकावर असून, नाशिकमधील एक लाख 99 हजार 534 विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली. ही परीक्षा प्रत्येक शाळेत सुरळीत पार पडत असून, आतापर्यंत कोणताही गोंधळ झाला नसल्याची माहिती कल व अभिक्षमता चाचणीच्या राज्य समन्वयक व समुपदेशक पल्लवी देव यांनी दिली.

मुंबई           3,41,901
पुणे            2,69,234
नाशिक        1,99,534
औरंगाबाद     1,82,228
नागपूर         1,61,746
अमरावती      1,66,296
कोल्हापूर      1,39,795
लातूर          1,06,622
कोकण          34,5३0
…………………………………..
एकूण         16,01,886

First Published on: January 19, 2019 4:48 AM
Exit mobile version