पुरामुळे एसटीचे १०० कोटी बुडाले!

पुरामुळे एसटीचे १०० कोटी बुडाले!

मुसळधार पाऊस आणि पूर-परिस्थितीमुळे एसटीला सुमारे 100 कोटींचा फटका बसला आहे. एसटीचे अनेक आगार, बसस्थानके, बसेस पाण्यामध्ये अडकल्यामुळे तेथील मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूर परिस्थिती ओसरल्यानंतर या मालमत्तेच्या नुकसानीचा नेमका आकडा कळू शकेल, असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. मात्र सद्यस्थितीला 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर मालमत्तेच्या नुकसानीचा अंदाज आहे.

गेली 10 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा थेट फटका राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीलादेखील बसला आहे. मराठवाडा वगळता इतर भागांमध्ये एसटीची दैनंदिन वाहतूक बहुतांश ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटीचा दररोजचा 4 ते 5 कोटी रुपयांच्या महसूल बुडाला आहे. दररोज 18000 बसेसच्या माध्यमातून 55 लाख किलोमीटर प्रवास होत असून त्यातून सरासरी 22 कोटी रुपये उत्पन्न मिळते. पण गेल्या 10 दिवसापासून पावसामुळे दररोज एसटीच्या किमान 10 लाख किलोमीटरच्या बस फेर्‍या रद्द केल्या आहेत. परिणामी एसटीच्या 4 ते 5 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.

तर कोल्हापूर विभागाचा दैनंदिन महसूल 50 लाख आहे. परंतु गेल्या चार दिवसापासून या विभागाच्या 12 आगारातून कोणत्याही प्रकारची वाहतूक होऊ शकली नाही. ही परिस्थिती सांगली, सातारा व कोकणातील काही विभागांमध्ये आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

First Published on: August 11, 2019 5:57 AM
Exit mobile version