MNS Vs Congress : काँग्रेसचे चिन्ह बदला किंवा पोलिसांच्या गणवेशावरील…, मनसेच्या नव्या मागणीने वाद

MNS Vs Congress : काँग्रेसचे चिन्ह बदला किंवा पोलिसांच्या गणवेशावरील…, मनसेच्या नव्या मागणीने वाद

काँग्रेसचे चिन्ह बदला किंवा पोलिसांच्या गणवेशावरील..., मनसेच्या नव्या मागणीने वाद

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आपला उमेदवार उतरविला नसला तरी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. ज्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा त्यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. पण आता एक नवी मागणी करत मनसे पक्ष राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. मनसे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी काँग्रेसच्या चिन्हाची म्हणजेच हाताची पंजाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यांच्या या तक्रारीमुळे काँग्रेस वि. मनसे असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (MNS Vs Congress symbol objection by Maharashtra Navnirman Sena Party complaint to Election Commission)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे तक्रार करत काँग्रेस पक्षाचे पंजा हे चिन्ह बदला किंवा पोलीस दलाच्या बोधचिन्हांमध्ये असलेला पंजा काढून टाका अशी मागणी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या संदर्भातील निर्णय लगेच न झाल्यास त्यांनी या संदर्भात न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग या प्रकरणात नेमका काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागलेले आहे. “पंजा” या चिन्हामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार मनसे नेते अशोक तावरे यांच्याकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024: राज ठाकरेंवर हल्ला करण्याचा प्लॅन, तुमचीच लोक…; मनसे नेत्याचा दावा

मनसे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांच्या मागणीनुसार, काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह हे पंजा असून पोलीस दलाच्या बोधचिन्हामध्ये देखील पंजा चिन्हाचा वापर करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेशावर देखील पंजा चिन्ह असते. महत्त्वाची बाब म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक पोलीस कर्मचारी काम करत असतात, त्यामुळे त्यांच्या गणवेशावर असलेल्या पंजामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होतो, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसचे चिन्ह बदलावे किंवा पोलीस दलाच्या बोधचिन्हातील पंजा काढून टाकावा अशी मागणी मनसे नेत्याकडून करण्यात आली आहे.

मनसे नेते अशोक तावरे यांच्या या तक्रारीमुळे निवडणूक आयोगाची डोकेदुखी वाढणार आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चिन्हांचा वाद आधीच न्यायालयात पोहोचला आहे. हा वाद सोडविताना न्यायालयाच्या आणि निवडणूक आयोगाच्या आधीच नाकीनऊ आले आहेत. त्यात आता काँग्रेसच्या पंजाविषयी नवी तक्रार दाखल झाल्याने हा वाद उफाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेण्यात येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : उद्धव ठाकरे विकृत, तर राज ठाकरे…; नारायण राणेंची टीका

First Published on: April 29, 2024 6:45 PM
Exit mobile version