कोरोना प्रकरणी २ लाख ७७ हजार गुन्हे

कोरोना प्रकरणी २ लाख ७७ हजार गुन्हे

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात लागू करण्यात आलेल्या कलम १८८ अंतर्गत आतापर्यंत तब्बल २ लाख ७७ हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर १३४७ वाहनांवर अवैध वाहतुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. १८८ कलमांतर्गत दाखल गुन्ह्यांमधून आतापर्यंत ३० कोटी ३ लाखांची दंड आकारणी केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात २२ मार्च ते ६ आक्टोंबरपर्यंत कलम १८८ नुसार २ लाख ७७ हजार ८३७ गुन्हे नोंदवण्यात आले आहे. या गुन्ह्यांमध्ये ४० हजार व्यक्तींना अटक करण्यात आली. तर ९६,५४७ वाहने जप्त केली आहेत. या काळात अवैध वाहतूक करणार्‍या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.१८८ कलमांतर्गत विविध गुन्ह्यांसाठी ३० कोटी ०३ लाख ५३ हजार ८८२ रुपये दंड आकारण्यात आला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३७० घटना घडल्या. त्यात ८९८ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० क्रमांकावर १ लाख कॉल

पोलीस विभागाचा १०० क्रमांक हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर १,१३,८०६ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

२५७ पोलिसांचा मृत्यू

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात राज्यातील २३२ पोलीस व २५ अधिकारी अशा २५७ पोलिस कर्मचारी व अधिकार्‍यांचा मृत्यू झाला. पोलिसांना कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

First Published on: October 7, 2020 7:24 PM
Exit mobile version