जालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर; अशोकराव चव्हाणांच्या संकल्पनेतील प्रकल्पाला गती

जालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर; अशोकराव चव्हाणांच्या संकल्पनेतील प्रकल्पाला गती

मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड या द्रुतगती महामार्गाचे भूसंपादन आणि अनुषांगिक कामांसाठी ‘हुडको’ने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला २ हजार १४० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. या निधीमुळे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूसंपादनाला गती प्राप्त होणार आहे.

सुमारे १९० किलोमीटर लांबीच्या व १२ हजार कोटी रुपये अंदाजित खर्च असलेल्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी जालना जिल्ह्यातील जालना, मंठा, परतूर, परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, परभणी, पूर्णा तर नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यात सुमारे २ हजार हेक्टर भूसंपादन होणार आहे. भूसंपादनासाठी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात २५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, हा निधी अपुरा असल्याने पुढील अधिवेशनात अधिक ७५० कोटी आणि त्यानंतर पुढील अर्थसंकल्पात आणखी १ हजार कोटी रुपये मंजूर व्हावेत, यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण प्रयत्नशील असतानाच ‘हुडको’ने २ हजार १४० कोटी रुपयांच्या कर्जाच्या प्रस्तावास मान्यता दिल्याने भूसंपादनाचे काम वेगाने पूर्ण होणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची या प्रकल्पाची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नियुक्ती झाली आहे.

जालना-नांदेड द्रुतगती जोडमहामार्गामुळे मराठवाड्याच्या पूर्वेला असलेल्या परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाशी थेट संपर्क मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या तीनही जिल्ह्यातून औरंगाबाद, पुणे आणि मुंबईला जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेत आणि पैशात मोठ्या प्रमाणात बचत शक्य होईल. शेतकरी, व्यापारी, उद्योजक, प्रवासी अशा सर्वच घटकांना मोठा लाभ होणार असल्याने महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला, ८ मार्च २०२१ रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाची घोषणा झाली होती. या प्रकल्पाला ‘हुडको’ने अर्थसहाय्य मंजूर केल्यामुळे भूसंपादन प्रक्रियेला गती मिळून प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होईल, असा विश्वास अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.


हेही वाचाः दसरा मेळाव्याला उरले अवघे काही तास, कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने; प्रतिष्ठेच्या लढाईत कोण जिंकणार?

First Published on: October 4, 2022 10:06 PM
Exit mobile version