मुंबईत २,२०३ गायीचे लम्पी विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण

मुंबईत २,२०३ गायीचे लम्पी विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण

मुंबई : मुंबईतील गोजातीय व म्हैस-वर्गीय जनावरांमध्ये लम्पी या विषाणूच्या प्रादुर्भावाची संभाव्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने ‘लम्पी’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईतील २,२०३ गायींना लम्पी विषाणू प्रतिबंधात्मक लस दिली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात ३,२२६ गोजातीय, तर २४,३८८ म्हैस-वर्गीय जनावरे आहेत. उर्वरित गोजातीय जनावरांचे लसीकरण पुढील आठवड्यात होईल, अशी माहिती पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख तथा देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे. (2203 cow lumpy virus preventive vaccination in Mumbai)

मुंबई महापालिका आयुक्त डॉ.इकबाल चहल व अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्या सुचनांनुसार लम्पी’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुवैद्यकीय आरोग्य खात्याद्वारे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

सन २०१९ च्या पशुगणनेनुसार मुंबईत ३ हजार २२६ गोजातीय जनावरे व २४ हजार ३८८ म्हैस-वर्गीय जनावरे आहेत. निर्धारित प्राधान्यक्रमानुसार यापैकी गोजातीय जनावरांचे लम्पी प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात येत आहे. यानुसार आतापर्यंत २ हजार २०३ गोजातीय जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

लम्पी साथरोगाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गोजातीय व म्हैस-वर्गीय जनावरांचे सर्वेक्षण यापूर्वीच सुरु करण्यात आले आहे, असा दावा पालिकेने केला आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या कीटक नियंत्रण खात्याद्वारे गोशाळा व आजूबाजूच्या परिसरात योग्य त्या उपाययोजना करण्यास देखील प्रारंभ करण्यात आला आहे, असा दावाही डॉ. कलीमपाशा पठाण यांनी केला आहे.

ज्यांच्या गोजातीय जनावरांचे लसीकरण झाले नसेल त्यांनी मुंबई महापालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याकडे ०२२-२५५६-३२८४ आणि ०२२-२५५६-३२८५ या क्रमांकावर संपर्क साधून लसीकरणाबाबत विनंती नोंदवावी, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

लम्पी विषाणूबाबत पालिकेच्या उपाययोजना


हेही वाचा – रक्षाबंधनसारख्या पवित्र नात्याचे कुणीही राजकारण करू नये; भावना गवळींचा उद्धव ठाकरेंना टोला

First Published on: September 22, 2022 8:19 PM
Exit mobile version