माघी यात्रेच्या मुहूर्तावर पंढरपूर शहरासह १० गावात २४ तासांची संचारबंदी लागू

माघी यात्रेच्या मुहूर्तावर पंढरपूर शहरासह १० गावात २४ तासांची संचारबंदी लागू

राज्यात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा एकदा पसरु लागला आहे. अमरावती, अकोला त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यातही कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंढपूरात होणारी माघी यात्रा रद्द करण्यात आली आहे त्यामुळे यंदाच्या पंढरपूरच्या माघी यात्रेला भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. यंदाची माघी यात्रा भक्तांविना साजरी करावी लागणार आहे. यात्रेसाठी २२ फेब्रुवारी रात्री १२ वाजल्यापासून २३ फेब्रुवारी रात्री १२ वाजेपर्यंत संचार बंदी जाहीर करण्यात आली आहे. माघी यात्रेत पंढरपूर शहरासोबतच १० गावांमध्ये २४ तासांची संचार बंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहे. कोरोनाच्या वाढच्या प्रादुर्भावामुळे माघी यात्राही रद्द करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  शहरातील सर्व मठ आणि धर्मशाळांमध्ये आलेल्या भाविकांना आणि वारकऱ्यांना परत पाठवण्याची जबाबदारी तिथल्या पोलिसांना देण्यात आली आहे. यावेळी उपस्थित राहिलेल्या सर्वांची कोरोना चाचणीही करावी लागणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही संचार बंदी जारी करण्यात आल्याने २२ फेब्रुवारी म्हणजेच माघ शुद्ध दशमी ते २३ फेब्रुवारी म्हणजेच माघ शुद्ध एकादशीच्या रात्रीपर्यंत ही संचार बंदी असणार आहे. माघी यात्रेच्या दिवशी दोन दिवस पंढपूरचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. त्याचबरोबर आताच्या काळात एसटी बसेस, खाजगी वाहनांना जरी प्रवेश सुरु असला तरी पंढरपूरच्या मंदिरात कोणत्याही भविकांना किंवा दिंड्यांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

मागच्या वर्षी ही कोरोनाच्या संकटामुळे आषाढी आणि कार्तिकी वारी रद्द करण्यात आली होती. कोरोनाचा कहर कुठेतरी कमी झाला असताना माघी यात्रेच्या निमित्ताने भाविकांना विठ्ठलाचे दर्शन मिळेल अशी आशा होती मात्र यंदाची माघी यात्रा ही भाविकांविनाच साजरी होणार आहे.


हेही वाचा – शिवाजी महाराजांनीसुद्धा कोरोनाच्या संकटात रयतेच्या रक्षणास कठोर निर्बंध लावलेच असते – सामना अग्रलेखातून विरोधकांवर टीका

 

 

First Published on: February 20, 2021 1:44 PM
Exit mobile version