२९० रस्ते बंद,४६९ रस्त्यांवरील वाहतूक खंडीत,१४० पूल पाण्याखाली

२९० रस्ते बंद,४६९ रस्त्यांवरील वाहतूक खंडीत,१४० पूल पाण्याखाली

राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्राथमिक अंदाजानुसार २९० रस्ते बंद पडले असून ४६९ रस्त्यांवरची वाहतूक खंडित झाली आहे तर १४० पूल आणि मोर्‍या पाण्याखाली गेले आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पावसामुळे झालेल्या रस्ते आणि पुलांच्या हानीची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील कोकण आणि पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते, पुलांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकार्‍यांना दौरा करण्याचे निर्देश चव्हाण यांनी दिले आहेत. नुकसानीचा आढावा घेऊन तातडीने अहवाल देण्याचे निर्देशही संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

अतिवृष्टीमुळे अनेक भागातील रस्ते आणि पुलाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकार्‍यांना प्रभावित जिल्ह्यांचा दौरा करण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या आहेत. त्यानुसार, सातारा आणि पुणे जिल्ह्यात पुण्याचे मुख्य अभियंता साळुंखे, सांगली जिल्ह्यात औरंगाबादचे मुख्य अभियंता उकिर्डे, कोल्हापूरमध्ये मुंबईचे मुख्य अभियंता के.टी. पाटील, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये कोकण विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश इंगोले, पालघर, ठाणेमध्ये नाशिकचे मुख्य अभियंता पी.बी. भोसले आणि रायगडमध्ये सहसचिव रामगुडे हे भेट देणार आहेत. या अधिकार्‍यांना दररोज अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.

First Published on: July 27, 2021 5:30 AM
Exit mobile version