महाराष्ट्रातील ५ लाख लोक मधुमेहग्रस्त

महाराष्ट्रातील ५ लाख लोक मधुमेहग्रस्त

जगातील एकूण मधुमेहींपैकी ४९% भारतात

दरवर्षी मधुमेहाबाबत जनजागृती करण्यासाठी १४ नोव्हेंबर हा दिवस  ‘जागतिक मधुमेह दिन’ मानला जातो. बदलती जीवनशैली आणि सहज उपलब्ध होणाऱ्या फास्टफुडमुळे हल्ली असंसर्गजन्य आजार होण्याची शक्यता बळावली आहे. सध्या एनसीडी म्हणजेच नॉन-कम्युनिकेबल डिसीजचा वाढता प्रभाव आहे. त्यात डायबिटीस, रक्तदाब, हायपरटेन्शन, कॅन्सर या आजारांचा समावेश आहे. हे सर्वच आजार खरंतर ‘सायलेंट किलर’ नावाने ओळखले जातात. यामधील डायबिटीस या आजारावर कंट्रोल करता येऊ शकतो.

हेही वाचा – मुंबई होतंय ‘डायबिटिसचं शहर’, डी वॉर्डमध्ये सर्वाधिक मधुमेही!

राज्यात ५.७ लाख लोक मधुमेहाने ग्रस्त

राज्याच्या आरोग्य संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ५.७ लाख लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. म्हणजेच, महाराष्ट्रातील एकूण १५ टक्के लोकांना मधुमेहाचा आजार आहे.  त्यापैकी, ४.१ लाख रुग्णांवर राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर, १ लाख रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, भारतात मधुमेहाचे ६ कोटी ५० लाख रुग्ण आहेत. तर मुंबईत २० टक्के लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. त्यात २० ते ४० वयोगटातील लोकांचा समावेश आहे. आरोग्य संचालनालयाच्या असंसर्गजन्य आजार नियंत्रण विभागाकडून राबवण्यात आलेल्या शिबीरांमार्फत गेल्या ५ वर्षात २ करोड ६८ लाख लोकांची तपासणी केली गेली आहे. त्यात ५. ७ लाख लोकांना मधुमेह असल्याचं समोर आलं आहे. ज्याचं प्रमाण शहरी भागात १० ते १५ टक्के आहे. तर, ग्रामीण भागात ५ ते ७ टक्के आहे.

हेही वाचा – योग जुळवा आणि रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह पळवा !

आरोग्य विभागाकडून कार्यक्रम राबवण्यात आले

आरोग्य विभागाकडून ३४ जिल्ह्यांमध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीजसाठी कार्यक्रम राबवला जात आहे. त्यात २०१७ -१८ या साली पॉप्युलेशन बेस्ड स्क्रिनिंग किंवा युनिव्हर्सल स्क्रिनिंग राबवण्यात आलं. जिथे आशा सेविका, अंगणवाडी सेविका, स्टाफ नर्स, त्यासोबतच वैद्यकीय अधिकारी यांना ५ किंवा ३ दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येतं. जे लोक सेंटरपर्यंत पोहचू शकत नाहीत त्यांच्यापर्यंत हे अधिकारी पोहोचतात. त्यातून लोकांना उपचार आणि सल्ले देण्यास मदत होते. शिवाय, या सर्वेक्षणात जे हायरिस्क रुग्ण आढळतात त्यांना जवळच्या रुग्णालयात किंवा क्लिनिकमध्ये उपचारांसाठी पाठवलं जातं.

राज्याच्या एकूण ३४ जिल्ह्यांमध्ये असंसर्गजन्य आजारांसाठी दरवर्षी शिबीरं राबवली जातात. त्यातून गेल्या ५ वर्षात राबवण्यात आलेल्या शिबिरांअंतर्गत राज्यात एकूण ५.७ लाख लोक हे मधुमेहग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. शिवाय, शहरी भागात ही १५ टक्के लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. या शिबिराअंतर्गत लोकांची तपासणी करण्यात येते. त्यामुळे आता जवळपास ७० टक्क्यांपर्यंत स्क्रिनिंग पूर्ण झालं आहे. या स्क्रिनिंगमध्ये ३० वर्षांवरील सर्वांचींच तपासणी केली जाते. त्यात किमान २५ टक्के हायरिस्क लोकसंख्या आढळते.

-डॉ. बाळू मोटे, आजार नियंत्रण विभागाचे राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, आरोग्य संचालनालय

तर याविषयी असंसर्गजन्य रोगनियंत्रण विभागाच्या सह संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितलं की, ” यंदा डायबिटीस दिनाची मधुमेह आणि कुटुंब ही थीम आहे. मधुमेह असलेल्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णाला खूप सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्यांच्या आरोग्याच्या सवयी, त्यांचं डाएट, नियमित तपासणी , नियमित व्यायाम अशा सर्वच गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. शिवाय मधुमेह होऊ नये म्हणून योग्य त्या चाचण्या आणि लवकर निदान होणं ही गरजेचं आहे.”


हेही वाचा – मधुमेहाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का

First Published on: November 14, 2018 8:20 AM
Exit mobile version