कर्ज फेडण्यासाठी ५ वर्षांच्या मुलाचे अपहरण

कर्ज फेडण्यासाठी ५ वर्षांच्या मुलाचे अपहरण

वाकड पोलीसांच्या टीमने दोन्ही आरोपींना गजाआड केले आहे.

कर्जबाजारी झालेल्या दोन इसमांनी लहान भावाच्या लग्नसाठी पैसे जमवण्यासाठी म्हणून, एका पाच वर्षीय मुलाचं अपहरण केलं. सुफियान खान असं अपहरण करण्यात आलेल्या चिमुरड्याचं नाव असून, चार दिवसांपूर्वी ओळखीच्या माणसांनीच अपहरण केलं होतं. दरम्यान, वाकड पोलिसांनी सुफियानची सुखरुप सुटका केली असून दोन्ही अारोपींना गजाआड केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरणापासून सुटकेपर्यंतचं हे संपूर्ण नाट्य एकूण ४ दिवस सुरु होतं. मोहम्मद शकील सलीम खान (३२) आणि शाहरुख मिराज खान (२६) अशी अपहरणकर्त्यांची नावं आहेत. यापैकी मोहम्मद शकील हा मुंबईच्या विरार फाटा परिसरात राहणारा आहे. तर, मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला शाहरुख मिराज हा चिंचवडमध्ये वास्तव्याला आहे. सुफियानचे वडील नासिर झाकीर खान यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती.

पैसे दिले नाहीत म्हणून अपहरण…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहरुख मिराज या आरोपीचे झम झम केटर्स आणि बिर्याणी हाऊस असून त्याच्याकडे मोहम्मद शकील हा कामासाठी होता. मराजच्या दुकानाशेजारीच अपहरण झालेल्या मुलाच्या आईचे लेडीज ब्युटी पार्लर हे शॉप आहे. त्यामुळे सुफियानची अपहरणकर्त्यांशी आधीपासूनच ओळख होती. आरोपी शाहरुख खानला अनेकदा सुफियानच्या आईने आर्थिक मदतही केली होती. आरोपीला आणखी पैसे हवे होते परंतु ते देण्यास सुफियानच्या कुटुंबाने नकार दिल्यामुळे त्याने सुफियानचे अपहरण करुन पैसे मागण्याचा बेत आखला. यामध्ये त्याने मोहम्मदलाही सहभागी करून घेतले.

अपहरण करण्यात आलेल्या मुलाला त्याच्या कुटुंबियांकडे सुखरुप सोपवण्यात आलं

Video: रितेश देशमुखच्या ‘माऊली’चा टिझर

घटना सविस्तर…

रविवारी दुपारी सुफीयान इमारतीच्या पार्किंगमध्ये मित्रांसोबत खेळत असताना आरोपी शाहरुख दुचाकीवर आला आणि सुफीयानला घेऊन तो पसार झाला.सुफीयान ओळखीचा असल्याने त्याला घेऊन जाण्यास जास्त वेळ लागला नाही. परंतु सुफीयान दिसत नसल्याने त्याचे आई-वडील घाबरले होते. बराचकाळ शोधल्यानंतरही सुफीयान न मिळाल्यामुळे त्यांनी वाकड पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी मुलाला शिक्रापूर येथील लॉजवर नेले. त्यानंतर ते सुफीयानला लोणावळा आणि मग तिथून मुंबईला घेऊन आले. दोन दिवसांनी सुफीयानच्या आईला शाहरुखचा फोन आला आणि त्यांनी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. यावेळी त्यांनी  मुलाला जीवे मारण्याची धमकीही दिली.

त्यानंतर वाकड पोलीस वेगवेगळे वेश धारण करून मुंबईला पोहोचले आणि सापळा रचत दोन्ही आरोपींना अटक केली. याप्रकरणी वाकड पोलीसचे ५ अधिकारी आणि ३० कर्मचारी तसेच गुन्हे शाखेचे ४ अधिकारी आणि २० कर्मचारी शोध घेत होते. दरम्यान, आपल्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आल्यामुळे खान कुटुंबियांनी वाकड पोलिसांचे आभार मानले.


वाचा: नालासोपाऱ्यामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

First Published on: November 8, 2018 5:29 PM
Exit mobile version