महाराष्ट्रातील ५४ पोलिसांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर

महाराष्ट्रातील ५४ पोलिसांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर

केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. केद्रींय गृहमंत्रालयानं या पोलिसांची नावे जाहीर केली आहेत. देशभरातील एकूण १०४० पोलिसांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये ४ राष्ट्रपती पोलीस सेवा शौर्य पुरस्कार, २८६ पोलीस शौर्य पुरस्कार, ९३ राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदकं आणि ६५७ उल्लेखनीय सेवा पोलीस या पदकांचा समावेश आहे. राज्यातील एकूण ५४ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर झाली आहेत. तर महाराष्ट्रातील दहा पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पोलीस पदक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

अर्चना त्यागी ( आयपीएस), संजय सक्सेना (आयपीएस), शशांक सांडभोर (सहा. पोलिस आयुक्त), वसंत साबळे (सहा.पोलिस निरीक्षक़) या चार अधिकाऱ्यांना विशिष्ठ सेवा पदक देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. तर मिठू नामदेव जगदाळे, सुरपत बावाजी वड्डे, आशिष मारूती हलामी, विनोद राऊत, नंदकुमार अग्रे, एमसीव्ही महेश्वर रेड्डी, समीरसिंह साळवे, अविनाश काबंळे, वसंत आत्राम, हमीत डोंगरे या पोलिसांचा शौर्य पदकानं सन्मान होणार आहे..

अर्चना त्यागींना राष्ट्रपती वरिष्ठ सेवा पदक

राज्य राखीव दलाच्या अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी यांना राष्ट्रपती वरिष्ठ सेवा पदक जाहीर झालं आहे. डीजीपी संजय सक्सेना, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत प्रभाकर सांडभोर आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक वसंत रामचंद्र साबळे यांनाही राष्ट्रपती वरिष्ठ सेवा पदक जाहीर झालं आहे. होम गार्ड आणि नागरी संरक्षण पुरस्कारांसाठी यंदा ४९ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

होमगार्ड, नागरी संरक्षण आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनाही विविध पुरस्कार जाहीर 

त्यापैकी, राष्ट्रपती होमगार्ड आणि नागरी संरक्षण विशिष्ट सेवा पदक २ कर्मचाऱ्यांना आणि उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल होम गार्ड आणि नागरी संरक्षण पदक ४७ कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आले आहेत. तर, जीवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या महाराष्ट्रातील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनाही विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अग्निशमन दलाच्या एकूण १०४ कर्मचाऱ्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यापैकी, १३ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती अग्नीसुरक्षा सेवा शौर्य पदक, २९ कर्मचाऱ्यांना अग्नीसुरक्षा सेवा शौर्य पदक, १२ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती अग्नीसुरक्षा विशिष्ट सेवा पदक आणि ५० कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अग्नी सेवा पदक जाहीर करण्यात आले आहेत.

First Published on: January 25, 2020 8:46 PM
Exit mobile version