पूरग्रस्त भागातील ‘चुली’ पुन्हा पेटणार!

पूरग्रस्त भागातील ‘चुली’ पुन्हा पेटणार!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पुरामध्ये सर्वस्व वाहून गेलेल्या हजारो कुटुंबियांच्या घरांमधील चुली आता पुन्हा पेटणार आहेत. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या सहकार्याने तब्बल ६० हजारांहून अधिक गॅसशेगडी पूरग्रस्त कुटुंबियांना वितरित केल्या जाणार आहेत. सोबतच गॅस दुरुस्तीसाठी दोनशेहून अधिक कुशल कारागीर हे पूरग्रस्त भागांमध्ये घरोघरी जाऊन गॅस शेगडींची मोफत तपासणी करणार आहेत.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच या संदर्भात पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन पूरग्रस्त नागरिकांसाठी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम, महाराष्ट्र नॅचरल ऑइल अँड गॅस आदी कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

काय म्हणालेत चंद्रकांत पाटील

पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करून पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी तीन आघाड्यावर काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पूरग्रस्त भागातील महिलांना छोटा गॅस सिलेंडर आणि शेगडी उपलब्ध करून देणे किंवा फक्त शेगडी उपलब्ध करून देणे. तसेच पूरग्रस्त भागांमध्ये तातडीने गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करणे, याला प्राधान्य देण्यात आले आहे‘.
नुकताच निर्माण झालेल्या गंभीर पूर परिस्थितीमुळे हजारो घरांमधील गॅस आणि शेगड्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यकाळात अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत या पेट्रोलियम कंपन्यांच्या माध्यमातून कुशल मेकॅनिक पूरग्रस्त भागांमधील प्रत्येक घरांमध्ये जाऊन गॅस आणि शेगडीच्या सुरक्षेबाबत खातरजमा करणार आहेत. तसेच नादुरुस्त शेगड्या आणि गॅस सिलेंडर संदर्भातील समस्या दूर करून नागरिकांचा संसार पुन्हा उभा करण्यात मोलाचा वाटा उचलणार आहेत‘, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच, एमएनजीएलचे संचालक राजेश पांडे यांनी बैठकीसाठी आणि या उपक्रमासाठी समन्वय करीत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – ‘राज्यातील पूरग्रस्त गावे खासदारांनी दत्तक घ्यावीत’


First Published on: August 16, 2019 8:22 PM
Exit mobile version