मुंबईच्या रस्त्यांवरील सहा हजार खड्डे बुजवले, पालिकेकडून ‘रॅपिड हार्डनिंग काँक्रिट’चा वापर

मुंबईच्या रस्त्यांवरील सहा हजार खड्डे बुजवले, पालिकेकडून ‘रॅपिड हार्डनिंग काँक्रिट’चा वापर

मुंबई महापालिकेने पावसाळ्या पूर्वीपासून ते आतापर्यंत रस्त्यांवरील तब्बल ३६ हजार खड्डे बुजवले आहे. तर गणेशोत्सव काळात पालिकेने खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी ‘रॅपीड हार्डनिंग काँक्रिट’ या नवीन तंत्रज्ञानासह ‘ कोल्ड मिक्स’ चा वापर करून व पाच कोटी रुपये खर्चून रस्त्यांवरील सहा हजार खड्डे बुजवले आहेत.

मुंबईत पावसाळ्यापूर्वीपासून रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या मुंबईकरांना भेडसावत आहे. मुंबई महापालिकेने ‘ कोल्ड मिक्स ‘ मटेरियलचा वापर करून सदर खड्डे बुजवले. मात्र गणेशोत्सव लक्षात घेता पलिकेने खड्डे बुजविण्यासाठी ‘रॅपीड हार्डनिंग काँक्रिट’ या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांवरील तब्बल सहा हजार खड्डे बुजवले.

विशेष म्हणजे सदर तंत्रज्ञानाचा वापर केल्यावर अवघ्या सहा तासांत खड्डा सुकतो व त्यावरून रस्ते वाहतूक सुरू करता येते. यासाठी गोदरेज आणि अल्ट्रा टेक कंपनीकडून रॅपीड हार्डनिंग काँक्रिट घेण्यात आले. त्यामुळे या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांवरील खड्डे बुजविणे शक्य झाल्याचा दावा पालिकेने केला आहे.
यासंदर्भातील माहिती पालिका उपायुक्त उल्हास महाले यांनी दिली.

पालिकेला गणेशोत्सवादरम्यान कमी कालावधीत निविदा काढून खड्डे बुजवण्याचे काम देणे शक्य नव्हते. त्यामुळे हमी कालावधीत नसलेल्या रस्त्यांची कामे जुन्याच कंत्राटदारांकडून करून घेण्यात आली. तर नव्या तंत्रज्ञानाने खड्डे भरण्यासाठी मुंबई शहर भागात १ कोटी, पूर्व उपनगर २ कोटी आणि पश्चिम उपनगरासाठी २ कोटींचा खर्च पालिकेने केला आहे.


हेही वाचा : अडीच वर्षात किती प्रकल्प बाहेर गेले याची माहिती जाहीर करणार – उद्योग मंत्री उदय सामंत


 

First Published on: September 14, 2022 10:36 PM
Exit mobile version