शहापूरमध्ये 18 महिन्यात 64 बालमृत्यू

शहापूरमध्ये 18 महिन्यात 64 बालमृत्यू

बालमृत्यू (प्रातिनिधिक छायाचित्र)

एकीकडे राज्य सरकारचे आरोग्य विभाग व बाल विकास प्रकल्प आदिवासी दुर्गम भागातील बाल मृत्यू व बालकुपोषण रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना दुसरीकडे मुंबईलगत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात गेल्या 18 महिन्यांत 64 बालमृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तर आदिवासी बालकांच्या कुपोषणाचा आकडा देखील मोठ्या प्रमाणावर वाढतच आहे.

गेल्या वर्षी 2018 मध्ये 47 तर या वर्षांतील जून महिना वगळता एप्रिल ते ऑक्टोबर 2019 या वर्षांतील सहा महिन्यात एकूण 17 बालमृत्यू असे एकूण अठरा महिन्यांत 64 बालमृत्यू झाल्याची माहिती शहापूर बालविकास प्रकल्प विभागातून हाती आली आहे. जन्मताच दुर्धर आजार, जन्मताच हदय विकार, जन्मताच काविळ, न्युमोनिया, दमा, श्वासावरोध, कमी वजनाचे, कमी दिवसांचे बालक, जन्मताच व्यंग अशा आणि इतर काही कारणांनी शून्य ते एक वर्षे, एक ते सहा वर्षे वयातील बालकांचे मृत्यू झाले आहेत.

अशाप्रकारे तालुक्यातील वासिंद , किन्हवली, डोळखांब, कसारा, अघई, शेंद्रुण, शेणवा, टाकिपठार, टेंभा येथील आरोग्य केंद्रात हे बालमृत्यू झालेले आहेत. तर मोठ्या प्रमाणावर कुपोषित बालकांचे प्रमाणही वाढत असल्याचे समोर आले.

तर 2019 या वर्षी दहा महिन्यांत जानेवारी ते ऑक्टोबर मध्ये 19 सॅम अतितीव्र तर मॅम 302 आदिवासी बालके कुपोषित असल्याची शासकीय नोंद शहापूर बालविकास प्रकल्प कार्यालयात करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. तालुक्यातील 569 अंगणवाड्या तसेच वासिंद, किन्हवली, शेंद्रुण, अघई, शेणवे, डोळखांब, टाकिपठार, टेंभे, कसारा या आरोग्य केंद्रात तसेच शहापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या आदिवासी गावपाड्यांत बालमृत्यू व कुपोषण ग्रस्त बालकांची वाढती आकडेवारी आढळून येत आहे. कुपोषणाचा वाढता आकडा पाहता आरोग्य यंत्रणा कुपोषण रोखण्यासाठी सपशेल अपयशी ठरल्याचे या कुपोषणाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

सुदृढ बालक जन्माला यावे व बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी मानव विकास कार्यक्रम अंतर्गत गरोदर मातांना सकस आहार व बुडीत मजुरीसाठी तर मातृत्व अनुदान योजनेकरीता शहापूर तालुका आरोग्य विभाग व बालविकास प्रकल्प दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. परंतु येवढ्या मोठ्या प्रमाणावर शासकीय निधी खर्च असूनही बालमृत्यू रोखण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचे धक्कादायक वास्तव शहापूर तालुक्यात दिसत आहे.

शहापूर तालुक्यातील बालमृत्यू व कुपोषण रोखण्याचे प्रयत्न आमचे युध्द पातळीवर सुरू आहेत. गाव व आदिवासी वाड्या वस्त्यांवर अंगणवाड्यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या मदतीने कुपोषणग्रस्त बालकांना उत्तम सकस आहार दिला जात आहे.
-विवेक चौधरी, बालविकास प्रकल्प अधिकारी, शहापूर

First Published on: December 10, 2019 6:28 AM
Exit mobile version