सणासुदीच्या काळात एसटीच्या ८०० कंत्राटी चालकांना काढून टाकले, महामंडळाचा निर्णय

सणासुदीच्या काळात एसटीच्या ८०० कंत्राटी चालकांना काढून टाकले, महामंडळाचा निर्णय

मुंबई – ऐन गणेशोत्सव काळात तब्बल ८०० कंत्राटी एसटी चालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे. कंत्राटी चालकांचा वापर कमी होत असल्याने शनिवारापसून त्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. संप काळात याच कंत्राटी चालकांनी एसटी सेवा सुरळीत ठेवली होती.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीन करा यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी संप पुकारला होता. जवळपास सहा महिने एसटी कर्मचारी संपावर गेल्याने ग्रामीण भागातील वाहतूक सेवा खोळंबली होती. दरम्यान, ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता संपकाळात एसटी महामंडळाने ८०० चालक आणि वाहकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली. एप्रिल २०२२ मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने सर्व चालक-वाहक कामावर रुजू झाले. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम कमी झाले. मात्र, त्यानंतरही कंत्राटी चालकांची मुदत वाढवण्यात येत होती.

सर्व एसटी कर्मचारी कामावर रुजू झाल्याने कंत्राटी कामगारांचा वापर कमी होत आहे. त्यामुळे ३ सप्टेंबरपासून कंत्राटी चालकांचा वापर बंद करण्याचा निर्णय महामंडलाने घेतला आहे, असे आदेश शुक्रवारी महामंडलाच्या वाहतूक विभागाकडून काढण्यात आले.

महामंडळाच्या पडत्या काळात ज्या कंत्राटी चालकांनी मदत केली त्यांनाच ऐन सणासुदीच्या धामधुमीत कामावरून काढून टाकल्याने चालकांना संताप व्यक्त केला आहे.

First Published on: September 3, 2022 12:49 PM
Exit mobile version