ठाण्यातील खड्ड्यांमुळे आणखी एकाचा बळी, दोन महिन्यात मृत्यूच्या संख्येत वाढ

ठाण्यातील खड्ड्यांमुळे आणखी एकाचा बळी, दोन महिन्यात मृत्यूच्या संख्येत वाढ

ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्यूच्या आणि अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सामान्य नागरिकांचे जिव जात असतानाही कुठल्याही उपाय योजना होताना दिसत नाहीयेत. दिवा येथील आगसन या ठिकाणी दुचाकीस्वार तरुणाचा खड्डे चुकवण्याच्या नादात एका टँकर खाली येऊन चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्रीच्या दरम्यान घडली.

गणेश पाले असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात खड्ड्यांनी घेतलेला हा ७ वा बळी आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पाले हा दिव्यातील आगासन येथे राहत होता. काही कामानिमित्त तो बाहेर गेला होता. सतंतधार पावसामुळे आगासन-दिवा रस्त्या नादुरुस्त झाला आहे. परंतु या रस्त्यावरून रात्रीच्या दरम्यान गणेश आपल्या दुचाकीवरून जात होता. यावेळी समोर खड्डा आल्यामुळे त्याने चुकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचदरम्यान त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो खाली पडला. तेवढ्यात समोरून येणाऱ्या एका टँकरखाली तो आल्याने त्याचा मृत्यू झाला.

मागील काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील नदीनाका भागातील खड्ड्यांमुळे आणखी एकाचा बळी गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. अशोक काबाडी असे मृताचे नाव असून खड्ड्यामुळे दुचाकीचा वेग कमी केल्याने मागून येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेमुळे त्याचा अपघात झाला. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा : मेट्रो प्रकल्पामुळे राजकीय प्रदूषणसुद्धा बंद झालं; मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला


 

First Published on: August 30, 2022 2:15 PM
Exit mobile version