छेड काढल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्या बहीण-भावावर कोयत्याने हल्ला

छेड काढल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्या बहीण-भावावर कोयत्याने हल्ला

नाशिक : छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या बहीण-भावावर चार ते पाच टवाळखोरांनी धारदार कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना अंबड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोरवाडी गावाजवळ घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनिकेत हूले, निलेश आहिरे, विशाल देवरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश गणेश भुजबळ (वय २१ रा. माणिकनगर, अंबड) याची बहीण ब्युटी पार्लरचा क्लास करून घराच्या दिशेने जात होती. त्यावेळी संशयित विशाल देवरे, निलेश अहिरे, गौरव पेलमहाले व इतर तीन साथीदारांनी बुरकुले हॉल जवळ तिची छेड काढली. हा प्रकार बहिणीने घरी जाऊन भावास सांगितला. त्यानंतर भाऊ उमेश भुजबळ व त्याची बहीण हे संशयितांना जाब विचारण्यासाठी गेले होते. त्यावेळी मोरवाडी गावाजवळ संशयित विशाल देवरे व त्याच्या साथीदारांनी उमेश याला मारहाण केली. त्यातील एकाने धारदार कोयत्याने उमेशच्या कपाळावर, पोटावर तसेच कमरेवर वार केले. यावेळी भावाला वाचवण्यासाठीमध्ये पडलेल्या बहिणही जखमी झाली. यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उमेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडून गंभीर जखमी झाला होता.

यावेळी बहिणीने आरडा ओरड केल्याने स्थानिक नागरिकांनी जखमी उमेश यास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयीतांविरोधात कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असून यातील अनिकेत हूले, निलेश आहिरे, विशाल देवरे यांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अटकेतील संशयितांनी न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अन्य दोन संशयित फरार असून पुढील तपास अंबड पोलीस करीत आहे.

First Published on: February 8, 2023 12:48 PM
Exit mobile version