सिंधुदुर्गात सुरू होणार पंचतारांकित हॉटेल

सिंधुदुर्गात सुरू होणार पंचतारांकित हॉटेल

सिंधुदुर्गात सुरू होणार पंचतारांकित हॉटेल,

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सिंधुदुर्गात आता देशविदेशातील पर्यटकांचा ओघ वाढतो आहे. हे लक्षात घेऊन सिंधुदुर्गातही पंचतारांकित हॉटेल व्हावे म्हणून राज्य सरकारने ताज ग्रुपसोबत सामंजस्य करार केला आहे. ताज ग्रुपकडून सिंधुदुर्गातील वेळागर-शिरोड्यात पंचतारांकित हॉटेल बांधण्यात येणार आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी याविषयी माहिती दिली.

ताज हॉटेल्स ग्रुप आता अधिकृतपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सिंधुदुर्ग जिल्हा गेल्या दोन दशकांपासून या क्षणाची वाट पाहत होता. महाविकास आघाडी सरकारने पहिल्या तीन महिन्यांतच समस्यांचे निराकरण केले आणि गुरुवारी या संदर्भात सामंजस्य करार झाला. असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले.

तीन वर्षांच्या कालावधीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेळागर-शिरोडा येथे ताज हॉटेल सुरू होणार आहे. ताज ग्रुपने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळ हॉटेल स्थापित करण्यासाठी सुद्धा सामंजस्य करार केला. ही दोन्ही हॉटेल्स महाराष्ट्रात 125 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आणतील असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

संपूर्ण पर्यटन विभागासाठी हा एक अत्यंत अभिमानाचा क्षण होता. अनेक हॉटेल ग्रुप महाराष्ट्रात गुंतवणूक करत असल्याने महाराष्ट्र राज्यातील आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळत आहे. यामुळे राज्यातील मिशन बिगिन अगेनलासुद्धा चालना मिळणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

First Published on: August 27, 2020 10:44 PM
Exit mobile version