ठाण्यात पुन्हा गोवरचा बळी

ठाण्यात पुन्हा गोवरचा बळी
ठाणे: उत्तरप्रदेश येथून काही महिन्यांपूर्वी मुंब्रा येथे राहण्यासाठी आलेल्या दीड वर्षीय  बालकाचा गोवर मुळे मृत्यू झाला. ठाण्यातील गोवरचा हा दुसरा बळी असून आठवड्यापूर्वी त्याच परिसरातील एका बालिकेचा मृत्यू झाला होता. त्या बालिकेप्रमाणे या बालकाने गोवरची लस घेतील नसल्याची बाब पुढे आली आहे.
मुंबईत तसेच आसपासच्या शहरांसह ठाणे शहरातही गोवर आजाराचे रुग्ण आढळून असून या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या ठाणे महापालिकेने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरु केले आहे. त्यात गोवरची लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. त्याचबरोबर गोवरची लस घेतलेली नाही अशा रुग्णांचा शोध घेऊन त्यांना लस देण्यात येत आहे. शीळ भागात एका साडे सहा वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता मुंब्रा कौसा भागातील आरोग्य केंद्रात पुन्हा दीड वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला असल्याची बाब समोर आली आहे. त्या बालकाला ताप आल्याने त्याच्या घरच्यानी खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी नेले होते. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी कौसा आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला २३ नोव्हेंबर ला ठामपा पार्किंग प्लाझा येथे दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती खालावल्याने त्याला २५ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलविण्यात आले. २७ नोव्हेंबर रोजी त्याची प्रकृती अधिक खालावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
 मागील अनेक दिवसांपासून आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या वेळी कौसा आरोग्य केंद्राच्या हद्दीत एक घरात लहान मुले असल्याची माहिती लपविण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा परिचारिका (एएनएम) लसीकरण मोहिमेसाठी गेले असता, त्या घरात दोन बालके असल्याचे आढळून आले. यामध्ये मृत्यू पावलेल्या बालकासह अन्य एक बालक असल्याचे आढळून आले. यामध्ये मृत्यू झालेल्या बालकाने एकही लस घेतली नसल्याची बाब समोर आली आहे. तर, दुसऱ्या बालकाने एक लस घेतली असून लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.
First Published on: December 1, 2022 9:55 PM
Exit mobile version