ठाण्यात रंगणार थरांचा थरार, आनंद दिघेंनी सुरू केलेल्या हंडीला अडीच लाखांचे बक्षीस

ठाण्यात रंगणार थरांचा थरार, आनंद दिघेंनी सुरू केलेल्या हंडीला अडीच लाखांचे बक्षीस

ठाणे – स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभीनाक्यावरील हंडी उत्सव ठाण्यात मानाची हंडी समजली जाते. या दहीहंडी महोत्सवात मुंबई आणि ठाणेकरांसाठी वेगवेगळ्या हंड्या उभारल्या जात असून त्या हंड्या फोडणाऱ्या मुंबई व ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी अडीच लाखांचे तर महिला गोविंदा पथकाला एक लाखांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. दोन वर्षांनंतर तोच उत्साह, तीच तरुणाईची धूम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी, गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष पहायला मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा दिमाखदार सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे. या उत्सवाची माहिती देण्याकरता आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. (A prize of two and a half lakhs for the handi started by Anand Dighe)

हेही वाचा – धनुष्यबाण कोणाच्या हाती? निवडणूक आयोगाच्या आधी सुप्रीम कोर्ट देणार निर्णय

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर ठाण्याच्या राजकीय, सांस्कृतिक घडामोडींकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेले असते. त्यातच, ठाण्यातील दहीहंडी सर्वत्र प्रसिद्ध आहे. गेले दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही दहीहंडी फक्त पारंपारिक पध्दतीने परंपरा खंडित न करता साजरी करण्यात आली. परंतु या वर्षी पुन्हा धर्मवीरांची ही मानाची हंडी त्याच उत्साहात, जल्लोषात साजरी होणार आहे. टेंभीनाक्यावरच्या हंडीत बक्षीसांबरोबरच त्याच दिवशी जाहीर केलेली बक्षीसे रोख स्वरुपात देण्यात येणार आहेत. तसेच मुंबईतील गोविंदा पथकासाठी व ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी २ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी १ लाख रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी १२ हजार, सहा थरांसाठी आठ हजार, पाच थरांसाठी सहा हजार तर चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी पाच हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा लता दीदींच्या जयंती दिनी २८ सप्टेंबरला संगीत महाविद्यालय सुरू करावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बैठकीत आदेश

दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी रॅपलिंगसाठी असणारे दोरखंड वापरण्यात येणार असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शहरप्रमुख रमेश वैती, हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण आदी उपस्थित होते.

दहीहंडीला साहसी खेळाचा लवकरच दर्जा मिळेल

दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा मिळून या खेळाची प्रो कब्बडीच्या धर्तीवर स्पर्धा व्हावी तसेच प्रत्येक गोविंदांचा राज्य शासनाने विमा काढावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या दोन्ही मागणीबाबत मुख्यमंत्री शिंदे हे लवकरच निर्णय घेतील, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. या खेळाचा शाळेत नववीपासूनच क्रीडा प्रकारात समावेश केला तर चांगले गोविंदा तयार होतील, असा प्रस्तावही शासनाला दिला असून त्यासही लवकरच मान्यता मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

First Published on: August 16, 2022 7:28 PM
Exit mobile version