पानटपरीवर खरेदी केल्यानंतर पैसे देण्याच्या वादातून दुकानचालकावर धारदार चाकूने वार

पानटपरीवर खरेदी केल्यानंतर पैसे देण्याच्या वादातून दुकानचालकावर धारदार चाकूने वार

चाकू हल्ला

नाशिक : हार्डवेअर व पानटपरीवर खरेदी केल्यानंतर पैसे देण्याच्या वादातून दुकानचालकावर धारदार चाकूने वार केल्याची घटना अंबडच्या सिमेंन्स कंपनीसमोर घडली. अंबड ग्रामस्थांवर एकामागे एक होत असलेल्या हल्ल्याच्या विरोधात काही वेळातच ग्रामस्थांनी घटनास्थळी दाखल होत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी मारहाण करणार्‍या चार ते पाच संशयतांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.२६) सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास अंबडच्या सिमेंट कंपनीसमोर तीन ते चार अज्ञात तरुण पानदुकान व हार्डवेअरच्या दुकानात खरेदी करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी सुट्टे पैसे नसल्याने दुकानदाराशी त्यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने संबंधित तरुणांनी दुकादारांवर धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केले. दुकानदारावर हल्ला झाल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी एकत्र येत मारहाण करणार्‍या तीन ते चार तरुणांना चोप दिला.

विशेष म्हणजे, दिवसाढवळ्या असा प्रकार घडल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. अंबड औद्योगिक वसाहतीत हाणामारी व लुटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, पोलिसांचा धाक उरला की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिवसेंदिवस मारहाणीचे प्रकार सातत्याने वाढू लागल्याने पोलिसांचे गुन्हेगारावर नियंत्रण नसल्याचा आरोप अंबड ग्रामस्थांनी करत सोमवारी गरवारे पॉईंट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थ साहेबराव दातिर, गोकुळ दातिर, शांताराम फाडोळ आदीसह ग्रामस्थांनी दिली आहे.

अनेक वर्षांपासून अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी करूनही प्रशासन दखल घेतली जात नाही. अंबडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. अंबड पोलिसांची यंत्रणा पुरेशा मनुष्यबळाअभावी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरत आहे. आतातरी शासन व प्रशासनाचे डोळे उघडतील का? की शासन व प्रशासन अधिक गंभीर गुन्हे घडण्याची वाट पाहत आहे. : साहेबराव दातीर, सामाजिक कार्यकर्ते

First Published on: March 27, 2023 1:06 PM
Exit mobile version