कौतुकास्पद कामगिरी..! सशस्त्र हल्ल्यातील गंभीर जखमी महिलेला तज्ज्ञ डॉक्टरांकडून जीवनदान

कौतुकास्पद कामगिरी..! सशस्त्र हल्ल्यातील गंभीर जखमी महिलेला तज्ज्ञ डॉक्टरांकडून जीवनदान

एका हल्लेखोराने धारदार शस्त्राच्या साहाय्याने एका विवाहित महिलेच्या मानेवर खोलवर जखम करणारा वार केल्याने महिलेवर स्वरयंत्र गमविण्याची भयानक परिस्थिती ओढावली होती. मात्र मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील कान, नाक, घसा वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ.रितू शेठ व त्यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत त्या महिलेवर अवघड मात्र यशस्वी शस्त्रक्रिया करून तिचे स्वरयंत्र व प्राणही वाचविण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यामुळे राजावाडी रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉ.रितू शेठ व त्यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमचे पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून अभिनंदन केले जात आहे.

मुंबई महापालिकेच्या घाटकोपर (पूर्व) स्थित राजावाडी रुग्णालयात १७ मार्च रोजी एका ३९ वर्षीय विवाहित महिलेला गंभीर जखमी म्हणजे अगदी मरणाच्या दारात पोहोचलेल्या अवस्थेत तातडीने दाखल करण्यात आले होते. एका हल्लेखोराने सदर महिलेवर प्राणघातक हल्ला करून म्हणजे अगदी त्या महिलेच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला होता. त्यामुळे रक्तबंबाळ होवून अत्यवस्थ झालेल्या महिलेला तिच्या नातेवाईकांनी तातडीने राजावाडी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

सदर गंभीर परिस्थिती पाहता राजावाडी रुग्णालयातील कान, नाक, घसा वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ.रितू के. शेठ यांच्या नेतृत्वाखालील डॉ. देविका शेरे, निवासी वैद्यकीय अधिकारी पूर्णिमा कुमार, डॉ. सुब्रमण्यम अय्यर आणि भूलतज्ज्ञ डॉ. योगिता किंजाले, त्यांचे सहकारी डॉ. महेश डोंगरे आदी तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने क्षणभरही वेळ न दवडता तात्काळ, युद्धपातळीवर त्या गंभीर जखमी महिलेवर उपचार सुरू केले. तसेच, तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

सदर जखमी महिला रूग्णाच्या मानेवर खोलवर जखमा झाल्याने श्वसनलिकेसह खुली झाली होती. ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची होती. तसेच प्रचंड रक्तस्त्राव देखील झाल्याने जखम स्वरयंत्रापर्यंत खोलवर असल्याने एकाचवेळी या सर्व बाबींवर उपचार करणे आवश्यक झाले होते. अशावेळी तातडीने श्वसननलिका दुरूस्ती (लॅरिन्गो) करत या महिलेचे प्राण वाचवले. तसेच स्वरयंत्रावरही उपचार केले. त्यानंतर या महिलेस राजावाडी रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने २४ मार्च रोजी घरी पाठविण्यात आले, अशी माहिती डॉ.रितू शेठ यांनी दिली.

उपनगरीय रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर व राजावाडी रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती राजूलवाला म्हणाल्या की, “राजावाडी रूग्णालयात दर महिन्याला कान, नाक, घसासंबंधी सुमारे दीड हजार रूग्ण बाह्य रुग्ण विभागात येतात. त्यातील सुमारे ३०० ते ४०० प्रकरणे ही तातडीच्या स्वरूपाची असतात. मानेच्या दुखापतींनी ग्रस्त रूग्ण देखील मोठ्या संख्येने येतात. महिन्याला सरासरी ७० शस्त्रक्रिया या रुग्णालयात करण्यात येतात. तरीही असे आपत्कालीन प्रसंग व त्यातून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी होवून रुग्ण बरा होणे, याचे समाधान काही औरच असते.’’


हेही वाचा : कसब्यात भाजपमध्ये मतभेद, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर टिळकांची नाराजी


 

First Published on: March 28, 2023 10:13 PM
Exit mobile version