होर्डिंग दुर्घटनेतील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना रेल्वेत नोकरी द्यावी

होर्डिंग दुर्घटनेतील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना रेल्वेत नोकरी द्यावी

पुणे होर्डिंग अपघात

मागील आठवड्यात पुण्यातील जुना बाजार येथील मुख्य चौकात होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला तर सात जण गंभीर जखमी झाले. हे होर्डिंग पाडताना झालेल्या चुकीने या चारजणांचा हकनाक बळी गेला असून त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे. त्यामुळे या घटनेतील मृत व्यक्तींच्या व गंभीर जखमी व्यक्तींच्या कुटुंबातील एका सदस्याला रेल्वे प्रशासनाने आपल्या सेवेत घेत त्यांच्या कुटुंबाला मदत करावी, अशी विनंती पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना केली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना अनिल शिरोळे म्हणाले की, पुण्यात मागच्या आठवड्यात झालेली ही घटना दु:खद, दुर्दैवी आणि चीड आणणारी आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या आधी रेल्वे प्रशासनाने घटनेतील मृत व्यक्तींबरोबरच गंभीर व किरकोळ जखमींना मदतीचा हात पुढे केला आहे. याबरोबरच या घटनेसाठी जबाबदार दोषींवर असलेल्यांवर कारवाई होत आहे. मात्र हे पुरेसे नाही.

कारण या दुर्घटनेत हकनाक बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांचे काय यावर आता विचार करायला हवा. हेच लक्षात घेत या घटनेतील मृत व्यक्तींच्या व गंभीर जखमी व्यक्तींच्या कुटुंबातील एका व्यक्तीस रेल्वेने आपल्या सेवेत सामावून घ्यावे. त्या कुटुंबियांना मदत करावी, अशी विनंती मी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना केली आहे. या विनंतीचा विचार पियुष गोयल करतील असा विश्वास असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

First Published on: October 10, 2018 1:00 AM
Exit mobile version