अभियोग्यताधारकांचा पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा

अभियोग्यताधारकांचा पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा

शिक्षक भरतीचा विषय हा ऐरणीवर आहे. संताप आनावर झाल्यामुळे अभियोग्यताधारकांचा थेट पुण्यावर १२ फेब्रुवारीला धडक मोर्चा ...

मागील अनेक वर्षांपासून राज्यातील शिक्षक भरतीचा प्रश्न रखडलेला आहे. रोजगाराची हमी देणाऱ्या राज्य सरकारने डीए.ड, बीए.ड झालेल्या विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मागील अनेक महिन्यांपासून शिक्षक भरतीचा प्रश्न ऐरणीवर असताना सरकार केवळ पोकळ आश्वासने देऊन पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहे. गेल्या १० फेब्रुवारीला शिक्षण मंत्र्यांनी पुढील सहा महिन्यात २४ हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा मोठ्या दिमाखात केली होती. शिक्षक भरतीसाठीची परीक्षा घेऊन १४ महिने उलटले तरीही २४००० जागांच्या भरतीचा विषय हा ऐरणीवरच आहे. त्यामुळेच बेरोजगार अभियोग्यताधारकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

संतप्त अभियोग्यताधारकांनी थेट पुणे शिक्षण आयुक्तांकडे धडक मारली आहे. १२ फेब्रुवारीला बेरोजगार अभियोग्यताधारकांनी धाव नाही तर धडक मोर्चाच काढण्यात येणार आहे. या धडक मोर्चासंबंधीत माहिती देताना अभियोग्यता उमेदवार कल्पेश ठाकरे यांनी सांगितले की, ‘धडक मोर्चात सहभागी होण्यास महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून किमान १,००० अभियोग्यताधारक येणार आहेत.’

‘धडक मोर्चा हा डीए.ड, बीए.ड झालेल्या विद्यार्थ्यांच्या संतापाचाच परिणाम आहे. पहिल्या टप्प्यात शिक्षण विभागाने १५ जिल्ह्यांत शिक्षक भरती जाहीर केली होती. मात्र आता सर्व जिल्ह्यातील रिक्त पदांची एकाच वेळी भरती करावी ही मागणी केली आहे. त्यामुळे सरळ मार्गाने पण आक्रमकपणाने आम्ही पुणे आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल करणार आहोत, असे कल्पेश ठाकरे यांनी सांगितले आहे.’

ट्विटरवरही शिक्षकभरतीच्या चर्चा

ट्विटरवरही सुद्धा शिक्षक भरती विषयी चर्चा सुरु आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यातून उमेदवारांचा असंतोष बाहेर पडताना दिसत आहे. ट्विटरवरही शिक्षकभरती म्हणून स्वतंत्र अकाऊंट कार्यरत आहे. शिक्षणभरती फसवणूक, शिक्षणभरती २४००० असे हॅशटॅग मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत.

First Published on: February 11, 2019 5:01 PM
Exit mobile version