साई रिसॉर्ट, कार्यालयावरील कारवाई; परबांनी सोमय्यांवर ठोकला १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

साई रिसॉर्ट, कार्यालयावरील कारवाई; परबांनी सोमय्यांवर ठोकला १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

मुंबई – शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्यांकडून सातत्याने अनिल परब यांच्यावर आरोप केले जात आहेत. यावरून अनिल परब यांनी संताप व्यक्त केला असून किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. म्हाडाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर अनिल परबांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मी सोमय्या यांना नाक घासायला लावणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत.

म्हाडाकडे मूळ बांधकामाचा नकाशा उपलब्ध नाही. पुढच्या आठ दिवसांत नकाशे मिळाले नाही तर मीच कारवाई करेन, असं अनिल परब म्हणाले. गेली दीड वर्ष भाजप नेते किरीट सोमय्या माझ्यावर आरोप करत आहेत. ही जागा माझी नाही असं मी सांगत होतो. यासंदर्भात मला म्हाडाकडून पत्र देण्यात आलं आहे. त्यामध्ये हे कार्यालय आणि जागा माझी नाही. माझा त्या जागेशी, कार्यालयाशी संबध नाही याबाबतच पत्र म्हाडाकडून मला देण्यात आलं आहे, असं अनिल परब म्हणाले.

कोणताही पाठपुरावा न करता अधिकाऱ्यांनी मला नोटीस पाठवली आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी. गांधीनगर वांद्रे पूर्व येथील जमीनीचा संबंध अनिल परब यांच्याशी नाही. यासंबंधी सर्व माहिती लेखी स्वरूपाची उपलब्ध आहे. किरीट सोमय्या लोकांची घरे फोडत आहेत. ही भूमिका भाजपची आहे का? असा सवालही यावेळी अनिल परब यांनी केला आहे. तसंच, ते पुढे म्हणाले की, अनिल परब यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत. अशा स्वरूपाचे एक लेखी पत्र म्हाडाने अनिल परब यांना दिलेलं आहे. याबाबत मी किरीट सोमय्या यांच्यावर अब्रूनुकसानीचा 100 कोटीचा दावा लावला आहे. किरीट सोमय्या यांना नाक घासायला लावणार, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

First Published on: January 31, 2023 6:40 PM
Exit mobile version