राज्यपालांच्या अभिभाषणातून जनतेची दिशाभूल, आदित्य ठाकरेंची टीका

राज्यपालांच्या अभिभाषणातून जनतेची दिशाभूल, आदित्य ठाकरेंची टीका

मुंबई – विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. आजच्या पहिल्याच दिवशी नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी अधिवेशनाच्या आधी हिंदीतून अभिभाषण केले. मात्र, त्यांच्या या अभिभाषणावरून सरकारवर आणि नवनियुक्त राज्यपालांवर सर्वत्र टीका होत आहे. राज्यपालांनी अभिभाषणादरम्यान मांडलेले मुद्दे हे दिशाभूल करणारे होते, अशी टीका युवासेना अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

अधिवेशन संपल्यानंतर आदित्य ठाकरेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणातील अनेक मुद्दे हे महाविकास आघाडीने सुरू केलेल्या कामांबाबत होते. आज सत्ताधारी पक्षाचा उत्साह कमी जाणवत होता. अभिभाषणात राज्यपालांनी दिशाभूल केलीय का असा प्रश्न होतो. दावोसबाबत त्यांनी चुकीची माहिती दिली. त्यामुळे सभागृहातील पटलावर सत्य बाजू येण्याचा आम्ही अधिवेशातून प्रयत्न करणार आहोत.

देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना तुरुंगात टाकण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील होते, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “गद्दारी करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी गेल्या सहा महिन्यांत १२ कारणे दिली आहेत. पण गद्दार हे गद्दारच असतात.”


 अभिभाषणात आशिष शेलार झोपले होते- मिटकरी

राज्यपालांचं अभिभाषण फार मोठं आणि बोअरिंग केलं. त्यांचं अभिभाषण सुरू असताना भाजपा नेते आशिष शेलार झोपा काढत होते, असं राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नुकतंच त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट शेअर केलंय. “आज #मराठीभाषागौरवदिन असताना राज्यपाल महोदयांनी अभिभाषण मराठीत केलं असतं किंवा भाषणाची सुरवात जरी मराठीत केली असती तरी मराठी मनाला आनंद झाला असता. पण यात राज्यपालांचीही चूक नाही. अभिभाषण तर राज्य सरकार तयार करत असतं! कदाचित दिल्लीच्या प्रभावाने सरकारलाच मराठीचा विसर पडलाय!” असं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलंय.

First Published on: February 27, 2023 2:19 PM
Exit mobile version