यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील विद्यापीठाच्या विविध प्रकारच्या शंभराहून अधिक शिक्षणक्रमांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश सुरू असल्याची माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. प्रकाश देशमुख यांनी दिली.

बदलत्या काळाची गरज ओळखून स्पर्धा परीक्षांना उपयुक्त, नवीन व्यवसायाभिमुख व कौशल्याधारित अभ्यासक्रमही विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या मानव्य विद्या व सामाजिकशास्त्रे, वाणिज्य व व्यवस्थापन, संगणकशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान, निरंतर शिक्षण, आरोग्य विज्ञान, शिक्षणशास्त्र या विद्याशाखांच्या विविध प्रकारच्या शिक्षणक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात प्रमाणपत्र, पदविका, पदवी व पदव्युत्तर अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी विद्यापीठात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कोविडनंतरही सुमारे पावणेसहा लाख होती. मानव्य विद्या व सामाजिकशास्त्रे शाखेत मराठी, उर्दू बीएसह हिंदी, मराठी, उर्दू, इंग्रजी, ग्रंथालय व माहितीशास्त्र, अर्थशास्त्र, लोकप्रशासन या विषयात एमए करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाणिज्य शाखेत एमकॉम, एमबीए, बीकॉम, बीबीए करण्याची संधी आहे. याबरोबरच विज्ञान शाखेतही बीएस्सीबरोबरच विविध विषयांत एमएस्सीचे शिक्षणक्रम उपलब्ध आहेत.

याशिवाय पाणी व्यवस्थापन, बांधकाम पर्यवेक्षक, सलून, टेलरिंग, छायाचित्रण, व्हिडीओ निर्मिती, पटकथा लेखन, सुरक्षा रक्षक, ग्रामरोजगार सेवक, शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन, पाली भाषा, सहकार व्यवस्थापन, पर्यावरण, शालेय व्यवस्थापन, घर कामगार कौशल्य असे विविध कौशल्याधिष्ठीत अनेक पदविका, प्रमाणपत्र शिक्षणक्रम विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. यंदा प्रवेश घेण्याची मुदत येत्या ३१ ऑगस्टपर्यंत आहे. विद्यापीठातर्फे प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. अधिक माहिती व प्रवेश घेण्यासाठी www.ycmou.ac.in किंवा www.ycmoudigitaluniversity.ac या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

First Published on: July 11, 2022 4:01 AM
Exit mobile version