अ‍ॅड. असीम सरोदे यांना हृदय विकाराचा झटका; शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधाराणा

अ‍ॅड. असीम सरोदे यांना हृदय विकाराचा झटका; शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधाराणा

अॅड. असिम सरोदे

प्रसिद्ध विधिज्ञ आणि मानवी हक्कांसाठी काम करणारे तरुण कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती मिळत आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय मानव अधिकार परिषदेसाठी ते जिनेव्हा येथे गेले होते. या दरम्यान तीव्र थंड हवामानामुळे त्यांच्या हृदयावर विपरीत परिणाम झाला. जिनेव्हातील थंड हवेच्या झोतामुळे त्यांच्या हृदयाला ताण पडत गेला. रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या आकुंचित पावल्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा होऊ शकला नाही. जिनेव्हा येथील मानव अधिकार परिषदेचे काम संपवून ते काही कामानिमित्त फ्रांसमधील ग्रेनोबल येथे गेले होते. तिथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची माहिती, मॅक्स महाराष्ट्र या वृत्त संकेतस्थळाने दिली आहे.

जिनेव्हातील परिषद संपवून आपल्या मित्रांना भेटायला सरोदे फ्रांस येथे आले होते. हृदयविकाराच झटका आल्यानंतर त्यांना त्यांच्या मित्रांनी सेंटर हॉस्पिटल युनिव्हर्सिटी आल्प्स ग्रेनोबल या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. पुढील काही दिवस त्यांना डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे माझे प्राण वाचले असल्याची प्रतिक्रिया सरोदे यांनी मॅक्समहाराष्ट्र संकेतस्थळाला दिली आहे.

कोण आहेत असीम सरोदे

असीम सरोदे हे यवतमाळ येथील सर्वोदयी कार्यकर्ते बाळासाहेब सरोदे यांचे चिरंजीव आहेत. ते ‘ह्यूमन राइट डिफेंडर फेलोशिप प्रोग्राम’ अंतर्गत मानवाधिकारभिमूख वकिली करतात. केंद्रीय नियोजन आयोगाच्या विधीविषयक अभ्यासगटाचे ते सल्लागार आहेत. कौटुंबिक हिंसाचार आणि कायदा, पॉईंट ऑफ व्ह्यू आणि बलात्काराची प्रकरणे हाताळताना (सहलेखिका – अॅड. रमा सरोदे) ही तीन पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

राजकारणाच्या एंट्रीवरून चर्चा

असीम सरोदे यांचे कार्यक्षेत्र पुणे जिल्हा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी आप पक्षाकडून पुणे लोकसभेसाठी त्यांना उमेदवारी देण्याची चाचपणी केली जात होती. २०१४ साली सुभाष वारे यांनी आपकडून निवडणूक लढवली होती. मात्र वैचारिक मतभेद झाल्यामुळे यावर्षी सरोदे यांना उमेदवारी देण्याची चर्चा आपमध्ये सुरु होती. मात्र यावर अंतिम निर्णय अद्याप होऊ शकला नाही.

First Published on: March 22, 2019 2:43 PM
Exit mobile version