सौंदर्यीकरण नंतर करा, आधी गोदावरीला गटारमुक्त करा

सौंदर्यीकरण नंतर करा, आधी गोदावरीला गटारमुक्त करा

नाशिक : नाशिक हे हजारो वर्षापासून धार्मिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक तीर्थक्षेत्र असून त्याला तीर्थाटनच राहू द्या, पर्यटन बनवू नका, नाशिकचा विकास तीर्थाटनाप्रमाणेच करा, पवित्र गोदावरीला ब्युटीफिकेशनची गरज नसून सांडपाणी ड्रेनेजच्या नाल्यांपासून मुक्तता हवी आहे. अन्यथा, गोदावरी आयसीयूमध्ये भरती होईल, अशा स्पष्ट शब्दांत सुप्रसिद्ध जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी महापालिका प्रशासनाचे कान उपटले.

राज्य शासनाच्या ‘चला जाणून घेऊ या नदीला’ या उपक्रमाच्या अनुषंगाने सुप्रसिद्ध जलतज्ज्ञ, स्टॉकहोम वॉटर प्राईझ व रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते राजस्थानचे रहिवाशी राजेंद्रसिंह दोन दिवस नाशिक दौर्‍यावर आले आहेत. त्यांच्यासोबत ‘चला जाणून घेऊ या नदीला’ या उपक्रमाचे ब्रँड अँबेसेडर चिन्मय उदगीर हेदेखील उपस्थित होते. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राजेंद्र सिंह म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. दरी गावात भेट दिली असता पाण्यासाठी गावकर्‍यांचा संघर्ष प्रकर्षाने जाणवला, याचे कारण जमिनीतील संपत चाललेला पाणीसाठा हेच आहे. गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष आहे कारण सूर्य पाणी चोरतोय. हे थांबविण्यासाठी कन्फाईंड व्हर्टिकल फ्रॅक्चरची उपाययोजना करणे गरजेचे आहे. यामध्ये जमिनीला खोलवर पडलेल्या भेगा शोधुन त्याद्वारे पाणी जमिनीत मुरविले जाते. केवळ, हाच उपाय जमिनीला, मानवी जीवनाला वाचवू शकतो. आम्ही राजस्थानमध्ये ही योजना केली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर झाले. एवढेच नव्हे तर चंबळच्या डाकूंनी बंदूक सोडून शेती सुरू केली. पूर्वीच्या सुकलेल्या नद्या आता वर्षभर दुथडी भरून वाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिकच्या गोदावरीला स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतामध्ये सुरू असलेले अवैध उत्खनन (मायनिंग) त्वरीत थांबविण्याची मागणी त्यांनी यावेळी राज्य सरकारकडे केली. मायनिंग थांबविणे सरकारी अधिकार्‍यांच्या हातात नसून याचे दोर बाह्यशक्तींच्या हातात आहे, मायनिंगविरोधात माजी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कारवाई केल्यामुळेच नाशिकमधून त्यांची त्वरीत उचलबांगडी करण्यात आल्याचा निर्भिड खुलासाही त्यांनी यावेळी केला. मायनिंगमुळे नाशिकला भविष्यात धोका आहे. ब्रह्मगिरीची पर्वतामधील हिरवळ आणि गोदावरीची पवित्रता यांचा जवळचा संबंध आहे. मात्र, हा संबंध टिकवायचा असेल तर मायनिंग त्वरित बंद करायला हवे. अन्यथा गोदावरी आयसीयूमध्ये भरती होईल असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला. ज्यांच्या मनात, डोळ्यात गोदावरी वाहते तेच गोदावरीला वाचवू शकतील असा अपराधिक टोलाही त्यांनी पालिका प्रशासनाला लगावला.

नाशिकला पाणीदार बनवण्यासाठी जिल्हा परिषदेने मिशन भगिरथ प्रयास ही योजना सुरू केली असून टँकरमुक्त नाशिकचे ध्येय साध्य करण्यास या योजनेचा लाभ होईल, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. भगिरथ योजनेद्वारे नाले, बंधार्‍यांची पुनर्बांधणी प्रक्रिया कार्यप्रवण अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली सुरू झाली आहे, अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली. ‘चला जाणून घेऊ या नदीला’ या उपक्रमाद्वारे राज्यभरातील सुमारे 75 नद्यांना अमृतवाहिनी बनविण्याची योजना महाराष्ट्र सरकार राबवत आहे, त्यामध्ये पवित्र गोदेचाही समावेश आहे. गोदावरी स्वच्छ, शुद्ध झाली तरच लाचार, बीमार, आणि बेकार नागरिकांच्या चेहर्‍यावर हास्य फुलेल हाच माझ्या दौर्‍याचा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हॉकिन्समुळे नदी प्रदूषणाची समस्या

स्वातंत्र्यपूर्व काळात बनारसमध्ये सांडपाणी नाल्यांच्या पाण्यावर स्वतंत्र प्रक्रिया होत होती मात्र 1932 मध्ये ब्रिटिश अधिकारी हॉकिन्स याने सांडपाणी, नाल्यांचे पाणी गंगा नदीत मिसळण्याचा वटहुकूम काढला for the beautification of city, we can link the rain with Ganga या वटहुकूमाद्वारे नाल्याचे पाणी गंगेत मिसळण्यास सुरुवात झाली आणि प्रदूषण वाढले हाच रोग आजही संपूर्ण भारतात पसरलेला दिसून येतो. याच्या विरुद्ध लोकसहभागातून लढा उभा राहिला हवा यासाठी राज्य शासनाने लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली.

गोदेला आजार हृदयाचा, इलाज दाताच्या डॉक्टरांकडून

स्मार्टसिटी अंतर्गत सध्या सुरु असलेल्या गोदेच्या ब्युटिफिकेशन संबंधी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी गोदेचे ब्युटिफिकेशन थांबवून तिला सांडपाणी आणि नाल्यापासून मुक्त करणे प्रथम आवश्यक असल्याचे सांगितले. गोदेला हृदयाचा आजार असतांना तिच्यावर दातांच्या डॉक्टरांकडून इलाज केला जात आहे, तेव्हा हृदयाचा आजार कसा बरा होणार, असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी पालिकेसह नाशिक स्मार्ट सिटी प्रशासनाला लगावला.

First Published on: February 24, 2023 4:23 PM
Exit mobile version