आगरी – कोळी भूमिपुत्र महासंघाचा एल्गार

आगरी – कोळी भूमिपुत्र महासंघाचा एल्गार

आगरी - कोळी भूमिपुत्र महासंघाचा एल्गार

राज्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असताना त्यामध्येच सद्या जातीचे राजकारण बघायला मिळत आहे. आगरी – कोळी भूमिपुत्र महासंघ भिवंडी, कल्याण, ठाणे – बेलापूर, पालघर, रायगड, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर, मुंबई ईशान्य या आठ लोकसभा मतदार संघातून उमेदवार उभे करणार असल्याने राजकीय पक्षांसह उमेदवारांची चांगलीच पाचावर धारण बसल्याने आता महासंघ कोणते उमेदवार उभे करणार याकडे लक्ष लागले आहे.

साडेतीन लाख अशी मतदारांची संख्या

सागरी किनाऱ्यावरील कोकण पट्टयातील नाळ जोडलेल्या भूमिपुत्रांमध्ये आगरी, कोळी, कुणबी, कराडी, भंडारी, तेली, तांबोळी तर धार्मिक संक्रमणामुळे धर्मांतरित ख्रिस्ती आणि मुस्लिम बांधव यांचा समावेश आहे. महासंघाच्या म्हणण्यानुसार, “या भूमिपुत्र मतदारांची अंदाजे संख्या भिवंडी – साडेपाच लाख, कल्याण – साडेचार ते पाच लाख , ठाणे – बेलापूर – सात ते नऊ लाख, पालघर – दोन ते अडीच लाख, रायगड -आठ लाख, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर, मुंबई ईशान्य तीन ते साडेतीन लाख अशी मतदारांची संख्या आहे.

भूमिपुत्राची कोंडी

विकासाच्या नावाखाली जमिनी महामार्गासाठी घेण्यात आल्यात परंतु त्याचा योग्य मोबदला देण्यात आला नाही, या ठिकाणावरून संपूर्ण मुंबईसह उपनगरांना पाणी पुरवठा केला जातो, मात्र भूमिपुत्रांना पाणी मिळत नाही, तसेच समृद्धी महामार्गात आमच्या भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे. यांसारख्या विकासाच्या नावाखाली भूमिपुत्रांच्या जमिनी बळकावल्या, रेती व्यवसायावर बंदी आणल्याने अनेक बांधव बेरोजगार झाले. यामुळे, समस्त भूमिपुत्राची कोंडी झाली आहे. मात्र याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने आंदोलने करावी लागत आहे. लोकप्रतिनिधी ठोस पावलं उचलत नसल्याने भूमिपुत्र एकत्र येऊन राजकीय पक्षांना आणि लोकप्रतिनिधी यांना धडा शिकवण्यासाठी हा आगरी – कोळी भूमिपुत्र महासंघ करून आता आठ लोकसभा मतदार संघातून उमेदवार उभे करणार आहेत , त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

या संदर्भात ठाणे येथे झालेल्या आगरी-कोळी भूमिपुत्र महासंघाच्या बैठकी दरम्यान महासंघाशी संलग्न असलेल्या विविध भागातील अनेक संघटना व त्यांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. सर्वसामान्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन इतर राजकीय पक्षांमागे फरफटत जाण्यापेक्षा स्वतःची राजकीय ताकद निर्माण करण्याचा एकमुखी निर्णय महासंघाचे अध्यक्ष ऍड. श्री भारद्वाज चौधरी यांनी जाहीर केला आहे .

राजकीय पक्षांचे धाबे दणाणले

यावेळी, अध्यक्ष ऍड भारद्वाज चौधरी यांनी असे जाहीर केले की, जेथे शक्य असेल तेथे आगरी-कोळी भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा स्थानिक भूमिपुत्र उमेदवार देण्याचा महासंघाचा मनोदय आहे. तर जिथे महासंघाचा उमेदवार नाही अशा ठिकाणी स्थानिक आगरी-कोळी भूमिपुत्रांचे प्रश्न वचननाम्याच्या अजेंड्यावर असणाऱ्या आगरी कोळी उमेदवाराला महासंघ पाठिंबा देणार आहे. आगरी-कोळी भूमिपुत्र महासंघाच्या या पावित्र्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे धाबे दणाणले असून अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

First Published on: March 28, 2019 11:50 AM
Exit mobile version