शिवसेनेच्या बंडावरून अजित पवारांचे भाजपकडे बोट, म्हणाले एका नेत्याच्या पत्नीने सांगितले की…

शिवसेनेच्या बंडावरून अजित पवारांचे भाजपकडे बोट, म्हणाले एका नेत्याच्या पत्नीने सांगितले की…

अजित पवार

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर मंत्रीमंडळव विस्तारांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यानंतर दिल्लीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीनंतर मंत्रीमंडळ विस्ताराविषयी चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर बारामतीत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मेळाव्यात टोलेबाजी केली.

देवेंद्र फडणवीसांवर टीका –

सुरुवातीच्या काळात अनेकजण म्हणाले की आमचा या घटनांशी दुरान्वयानेही संबंध नाही. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. पण नंतर एका नेत्याच्या पत्नीनेच सांगितले की माझा नवरा रात्री वेशभूषा बदलून अनेकदा इतरांना भेटायला जायचे. हे मी म्हणत नाही. एकीकडे तुम्ही सांगता की आमचा संबंध नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा गोष्टी घडत नव्हत्या. साम-दाम-दंड-नीतीचा अवलंब करून यातून मार्ग काढण्याचे ध्येय समोर ठेवून या गोष्टी केल्या गेल्या. त्यातून बंड झाले, असा टोला  देवेंद्र फडणवीसांना अजित पवार यांनी लगावला.

यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मनात धाकधूक –

कुठेतरी आत्ताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मनात धाकधूक असल्यामुळे त्यांनी स्वत:चा शपथविधी केला. पण इतर मंत्रीमंडळ विस्तार केला नाही. ११ तारखेनंतर विस्तार करू असे ते म्हणाले आहेत. कुठेतरी पक्षांतरबंदीच्या संदर्भात ज्या गोष्टी मधल्या काळात घडल्या किंवा इतर राज्यात अशा घटना घडल्या, तेव्हा काय निकाल लागले याकडे पाहाता येईल, असे अजित पवार म्हणाले.

सत्तेचा ताम्रपट कोणी घेऊन जन्माला नाही –

कुणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेले नाही. सत्ता येत, सत्ता जाते. ६७ सालापासून शरद पवार राजकारणात आहेत. आपण सगळ्यांनी चढउतार पाहिले आहेत. मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद पाहिले आहे. मंत्रीपद, राज्यमंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद पाहिले आहे. आजही विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आपण व्यवस्थितपणे पार पाडू. विरोधाला विरोध करण्याची भूमिका माझी नाही. मात्र, कुणी चुकत असेल, तर ती चूक सांगितली गेली पाहिजे, असे अजित पवारांनी यावेळी नमूद केले.

First Published on: July 9, 2022 7:45 PM
Exit mobile version